जळगाव : शहरात काही दिवसांपासून चढ-उतार होत असलेले सोन्याचे दर शुक्रवारी पुन्हा उच्चांकी पातळीवर पोहोचले. गुरुवारी प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ९५७ रुपये असा दर होता. शुक्रवारी हा उच्चांक मोडीत निघाला. दर एक लाख पाच हजार ८८४ रुपयांपर्यंत गेले. अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वधारल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना धक्का बसला आहे.
काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली तरी लगेचच पुन्हा दर उंचावतात, असे चित्र असताना गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर शुक्रवारीही वाढ नोंदवली गेली. दिवसभरात ९२७ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोने दराने प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख पाच हजार ८८४ रुपयांपर्यंत मजल मारली. रक्षाबंधनापूर्वी २४ कॅरेट सोन्याचे दर एक लाख चार हजार ५४५ रुपयांपर्यंत होते. दरम्यान, सोने-चांदीचा बाजार सध्या आर्थिक मंदीतून जात आहे.
चांदीचे दर स्थिरच
चांदीचे दर चार दिवसांपूर्वी अचानक तीन हजार रुपयांनी वधारून एक लाख २१ हजार ५४० रुपयांपर्यंत पोहोचले होते. तेव्हापासून चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आलेली नाही. शुक्रवारीदेखील चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २१ हजार ५४० रुपयांवर स्थिर राहिले.