जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहण्यास मिळाल्याने ग्राहक हैराण झाले होते. मात्र, दोन्ही धातुंची दरवाढ आता अचानक थांबली आहे. ग्राहकांना लग्नसराईसाठी सोने-चांदी खरेदी करण्याची मोठी संधी त्यामुळे चालून आली आहे.

गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या बाजारात चढ-उताराचे वातावरण कायम राहिले आहे. लग्नसराई सुरू झाल्यानंतर काही दिवस सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती, तर काही दिवस किंमतींमध्ये किंचित घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांच्या हालचाली, या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम सोन्याच्या दरावर दिसून आला. आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत थोडीशी घट नोंदवली गेली असली, तरी ही घसरण मर्यादित स्वरूपाची राहिली. म्हणजेच दरातील घसरणीचा वेग आता कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) तसेच देशांतर्गत बाजारातही सोन्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत किंचित खाली आले आहेत. सध्या बाजारात स्थैर्याचे वातावरण दिसत असले, तरी तज्ज्ञांच्या मते आगामी काळात जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलर-रुपया विनिमय दरातील बदल आणि सणासुदीच्या काळातील मागणी यावर सोन्याच्या किंमतींचा पुढील कल अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये विशेष चढ-उतार दिसून आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ हालचाली होत असल्या, तरी देशांतर्गत बाजारपेठेत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती जवळपास स्थिर राहिल्या आहेत. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनानंतर झालेली घसरण थांबून दोन्ही धातुंचे दर आता स्थैर्याकडे झुकताना दिसत आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोघांच्याही नजरा बाजारातील हालचालीवर केंद्रित आहेत.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीचा विचार करता निकटच्या भविष्यात सोने किंवा चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी किंवा घसरण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्या बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांसाठी हा काळ तुलनेने अनुकूल मानला जात आहे. मात्र, गुंतवणूक किंवा खरेदीचा निर्णय घेताना बाजारातील बदल आणि जागतिक घटकांवर सतत लक्ष ठेवणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल.

जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ३२ हजार ८७० रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरूच राहिल्याने शनिवारपर्यंत सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ९०९ रूपयांवर स्थिरावले. अशाच प्रकारे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरूच राहिल्याने शनिवारपर्यंत चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिरावले.