जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३८०० रुपयांपेक्षा अधिक तसेच चांदीत प्रति किलो सहा हजारांपेक्षा अधिक घट नोंदवली गेली होती. बुधवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा मोठा बदल झाल्याचे दिसून आले.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बैठकीच्या निकालापूर्वी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) सोने दरात मोठा बदल नोंदवला गेला. जागतिक स्तरावरही अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असूनही सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी वाढ झाली.
मात्र, अमेरिका-चीन व्यापार तणावात झालेल्या शिथिलतेमुळे सराफा बाजारातील तेजी काही प्रमाणात मर्यादित राहिली. येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती पुन्हा एकदा जागतिक आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहतील. गुंतवणूकदार या आठवड्यात होणाऱ्या मध्यवर्ती बँकांच्या निर्णयांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण हे निर्णयच आगामी काळात सोन्याच्या किमती वाढतील की घसरतील, हे निश्चित करतील. सोन्यात गुंतवणूक करणारे नेहमीच दरात घट होण्याची संधी साधून खरेदी करण्याची प्रतीक्षा करत असतात, असे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे.
जळगावमध्येही गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमती घसरताना दिसत होत्या. मात्र, बुधवारी या घसरणीला विराम मिळत सोन्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झाली. दिवाळीनंतर सुरू असलेली घसरण सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बाब ठरली होती. पण बुधवारच्या दरवाढीमुळे बाजार पुन्हा तेजीकडे वळताना दिसून आला आहे. शहरात दिवाळीला २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ३२ हजार रूपयांवर होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरू राहिल्याने सोमवारपर्यंत सोने जीएसटीसह एक लाख २६ हजार १७५ रुपयांपर्यंत खाली आले. मंगळवारी दिवसभरात आणखी ३८११ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २२ हजार ३६४ रुपयांपर्यंत घसरले. दिवाळीनंतर सुमारे १० हजार रूपयांची घट सोने दरात झाली. मात्र, बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्यात पुन्हा ७२१ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २३ हजार ०८५ रूपयांपर्यंत पोहोचले.
चांदीतही ३०९० रूपयांनी वाढ
दिवाळीत चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ७० हजार रूपयांपर्यंत होते. त्यानंतर सातत्याने घसरण सुरू राहिल्याने सोमवारपर्यंत चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ५५ हजार ५३० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यात मंगळवारी दिवसभरात आणखी ६१८० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ४९ हजार ३५० रुपयांपर्यंत घसरली होती. दिवाळीनंतर चांदीच्या दरात सुमारे २० हजार रुपयांची घट नोंदवली गेली. मात्र, बुधवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ३०९० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली.
