जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार सुरू असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सुद्धा दोन्ही धातुंच्या किमतीत मोठे बदल पाहण्यास मिळाले. चांदीने नवीन उच्चांक निर्माण केला, सोन्यातही तेजी पाहण्यास मिळाली. ज्या कारणाने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय चढ-उतार दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिर परिस्थिती तसेच गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल, यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंना मोठी मागणी निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांना सोने आणि चांदी ही सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीची साधने वाटत आहेत. परिणामी त्यांच्या किमती सतत चढ-उतार अनुभवण्यास मिळत आहेत. बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. चांदीची मागणी येत्या काळात सोन्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शनिवारी देखील सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठा बदल नोंदवला गेला. परंपरेने सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या या दोन्ही धातुंपैकी सध्या गुंतवणूकदारांचा कल चांदीकडे अधिक झुकलेला दिसत आहे.
बुधवारी सोन्याचा दर प्रति औंस सुमारे ३,३४० डॉलर्सवर पोहोचला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेड गव्हर्नर लिसा कुक यांना राजीनामा देण्याचे आवाहन केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणात वळणे सुरू केले. तज्ज्ञांचे मत आहे की पुढील काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. जळगावमध्येही शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख दोन हजार ५८८ रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर एक लाख तीन हजार ६१८ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
आता सर्वांचे लक्ष फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या आगामी भाषणावर केंद्रित झाले आहे. व्यापाऱ्यांच्या अपेक्षेनुसार फेड पुढील महिन्यात व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात करू शकते. व्याज दर घटल्यास सोने अधिक आकर्षक ठरू शकते. कारण त्यावर कोणतेही व्याज मिळत नसतानाही ते सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकप्रिय राहते. दुसरीकडे, घरगुती वापरासोबतच औद्योगिक क्षेत्रातही चांदीची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर ऊर्जा उद्योगात तिच्या वापराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महिन्यांत चांदीची मागणी सोन्यापेक्षा जास्त राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
चांदीत ३०९० रूपयांची वाढ
जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सुमारे ३०९० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी उच्चांकी एक लाख २१ हजार ५४० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली. एकाच दिवसात चांदीने गाठलेला उच्चांकी टप्पा लक्षात घेता ग्राहकांना मोठा धक्का बसला.