जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसऱ्यापासून सोन्याच्या दरात किंचित घट नोंदविण्यात आली होती. मात्र, शनिवारी बाजार उघडताच पुन्हा मोठी वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे नवीन उच्चांक प्रस्थापित केला. चांदीच्या दरानेही नवा उच्चांक केल्याचे दिसून आले.
नवरात्रीनंतर धनतेरस आणि दिवाळीच्या तोंडावर देशभरात दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरावर होत आहे. लग्नसराईसाठीही खरेदी वाढत असल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे, तर चांदीलाही जोरदार उसळी मिळाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारातही गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. अमेरिकन सरकारच्या संभाव्य शटडाऊनची भीती, मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सेफ हेवन मालमत्ता म्हणून सोन्याची चमक आणखी वाढली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँका आणि ईटीएफ फंडांकडून सातत्याने सोने खरेदी केली जात असून सोन्याच्या किंमतींना भक्कम आधार मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, भारतीय बाजारपेठेत सणासुदीचा काळ हा पारंपरिकरीत्या सोन्याच्या खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत या मौल्यवान धातूंची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गरिबांचे सोने म्हणून ओळखली जाणारी चांदीही ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. सणासुदीचा हंगाम, लग्नसराई आणि औद्योगिक मागणी या तिहेरी प्रभावामुळे चांदीच्या दरांनी विक्रमी झेप घेतली आहे. चांदीचे भाव वाढल्याने दागिने खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांवर दबाव निर्माण झाला आहे. पारंपरिकरीत्या सोन्याच्या तुलनेत स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारी समजली जाणारी चांदी आता घरगुती बजेटलाही ताण देत आहे.
विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा उपकरणे आणि उद्योग क्षेत्रात चांदीचा वाढता वापर हे देखील दरवाढीचे महत्त्वाचे कारण ठरले आहे. शहरात बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर एकाच दिवसात दोन हजाराहून अधिक वाढल्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २१ हजार ७४६ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, गुरूवारी दसऱ्याला कोणतीच दरवाढ न होता २०६ रुपयांची किरकोळ घट नोंदवली गेल्याने सोने एक लाख २१ हजार ५४० रुपयांपर्यंत खाली आले. शुक्रवारी पुन्हा २०६ रुपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख २१ हजार १२८ रुपयांपर्यंत खाली आले. शनिवारी मात्र ५१५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने जीएसटीसह एक लाख २२ हजार ०५५ रूपयांपर्यंत पोहोचले.
चांदीत ५१५ रूपयांनी वाढ
जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर एक लाख ५२ हजार ९५५ रूपयांच्या उच्चांकावर होते. शनिवारी बाजार उघडताच पुन्हा ५१५ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीने एक लाख ५३ हजार ४७० रूपयांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला.