जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरवाढीला काही प्रमाणात लगाम लागला होता. मात्र, दोन तारखेपासून लग्नसराई सुरू झाल्यानंतर लगेचच दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली आहे. बाजारातही ग्राहकांची बऱ्यापैकी वर्दळ वाढली आहे.
तुलसी विवाहानंतर सर्वदूर लग्नसराईची सुरूवात झाली असून, सोने आणि चांदीची मागणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, तर देशांतर्गत चांदीच्या वायद्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. कॉमेक्सवरील सोन्याचे जागतिक भाव ०.६६ टक्क्यांनी वाढून ४०२२.७० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसले. तसेच सोन्याचे स्पॉट मूल्य ०.२३ टक्क्यांनी वाढून ४०११.९४ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसले. सोमवारी सोन्यासोबतच जागतिक चांदीच्या किमतीही वाढताना दिसल्या आहेत. कॉमेक्सवरील जागतिक चांदीच्या किमती सुरुवातीच्या व्यवहारात ०.९० टक्के म्हणजेच ०.४४ डॉलरने वाढून ४८.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या. दरम्यान, स्पॉट सिल्व्हर ०.३९ टक्के म्हणजेच ०.१९ डॉलरने वाढून ४८.८८ डॉलर प्रति औंसवर पोहोचला.
लग्नसराईच्या हंगामामुळे आणि मागणीत वाढ झाल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लग्नसराईच्या काळात सोने-चांदी आवर्जून खरेदी केली जाते. येत्या आठवड्यात सोन्याची मागणी आणखी वाढेल, ज्यामुळे किंमतीत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेतही शुक्रवारी २०६ रूपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख २४ हजार ६३० रूपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, शनिवारी दिवसभरात १०३ रूपयांची किंचित घट नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २४ हजार ५२७ रूपयांवर स्थिरावले होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ३०९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख २४ हजार ८३६ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
चांदीत ३०९० रूपयांनी वाढ
जळगाव शहरात शुक्रवारी २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत पोहोचले होते. शनिवारी दिवसभरात आदल्या दिवशी जेवढी वाढ झाली होती, तेवढीच घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिरावली होती. मात्र, सोमवारी सकाळी पुन्हा ३०९० रूपयांची मोठी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ५७ हजार ५९० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली.
