जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सोन्यात २०० रूपयांची, तर चांदीत दोन हजार रूपयांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली होती. शनिवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात काय बदल होतात, त्याकडे ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष वेधले गेले होते. प्रत्यक्षात, सोन्याच्या दरात पुन्हा बदल झाला. चांदीच्या दरातही मोठे चढ-उतार पाहण्यास मिळाले.
अमेरिकेन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या कपातीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून आले आहेत. फेडच्या निर्णयानंतर सुरुवातीला सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली होती, नंतर पुन्हा घसरणीची प्रवृत्ती दिसून आली. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती, त्यानंतर बाजारात काहीसा स्थैर्याचा माहोल निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, फेडच्या दर कपातीमुळे सोन्यातील तीव्र घसरण रोखली गेल्याने सध्या बाजार स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. शुक्रवारी अनेक दिवसांच्या अस्थिरतेनंतर सोन्याचे दर तुलनेने स्थिर राहिल्याचे दिसून आले. शनिवारी पुन्हा तीच स्थिती दिसून आली.
आर्थिक अनिश्चितता, जागतिक बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या गुंतवणूक धोरणांचा सोन्याच्या भावावर थेट परिणाम होत आहे. येत्या काही दिवसांत फेडच्या पुढील निर्णयांवर आणि अमेरिकन डॉलरच्या हालचालींवर सोन्याच्या किंमतींचा आगामी कल अवलंबून राहणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्या काळात २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, दिवाळीनंतर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले असून सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. आजतागायत या घसरणीचा कल थांबलेला नाही, जरी दरात अधूनमधून किरकोळ वाढ होत असली तरी एकूणच दर खालीच आहेत.
तज्ज्ञांचे मत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि डॉलरच्या दरातील बदल यांचा थेट परिणाम स्थानिक सोन्याच्या किमतींवर होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतही हा घसरणीचा कल कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी २०६ रूपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख २४ हजार ६३० रूपयांपर्यंत पोहोचले होते. शनिवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३ रूपयांची किंचित घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २४ हजार ५२७ रूपयांपर्यंत खाली आले.
चांदीत २०६० रूपयांनी घट
जळगाव शहरात शुक्रवारी २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ५६ हजार ५६० रूपयांपर्यंत पोहोचले होते. शनिवारी सकाळी बाजार उघडताच आदल्या दिवशी जेवढी वाढ झाली होती, तेवढीच घट चांदीच्या दरात नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिरावली.
