मालेगाव : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यात वर्षभरात ५७ अपघातग्रस्तांच्या वारसांना एक कोटी १४ लाखाची रक्कम वाटप करण्यात आली आहे. एकूण १३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले असून त्यात तब्बल ११ अपघातग्रस्तांनी वाहन परवाना नसताना गाडी चालवली, या कारणावरून प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २०२४-२५ वर्षात मालेगाव तालुक्यातून एकूण ७४ प्रस्ताव दाखल करण्यात आले. तालुकास्तरीय समितीने पडताळणी करून त्यातील ५७ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे एकूण एक कोटी १४ लक्ष रुपये सानुग्रह अनुदानास मंजुरी दिली. समितीने १३ प्रस्ताव तपासणीनंतर अपात्र ठरविले. अपात्र प्रस्तावांपैकी ११ प्रकरणांमध्ये अपघातग्रस्तांनी वाहन चालविण्याचा वैध परवाना नसताना रस्त्यावर वाहन चालविल्याचे निदर्शनास आले. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांच्या नावे शेतजमीन नाही, या कारणावरून दोन प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. तर शवचिकित्सेचा अंतिम अहवाल नाही, या त्रुटीमुळे चार प्रस्ताव प्रलंबित राहिले.
प्रस्ताव मंजूर झालेल्या ५७ लाभार्थ्यांपैकी मार्चअखेर अनुदान प्राप्त झालेल्या ४० लाभार्थ्यांना ८० लाख रुपयांचे अनुदान वितरण यापूर्वीच करण्यात आले होते. उर्वरित १७ लाभार्थ्यांचा निधी शासनाकडून आता प्राप्त झाला. त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ३४ लाख रुपयांचे अनुदान मयत अपघातग्रस्तांच्या वारसदारांना नुकतेच वाटप करण्यात आले.
कुटुंबातील कर्ता पुरुष हरपल्याने अशा कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सावरणे आवश्यक आहे. शासनाकडून दिली जाणारी ही आर्थिक मदत संबंधित कुटुंबांना सावरण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, अशी भावना भुसे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, उपकृषी अधिकारी रत्ना बच्छाव,रोहिदास अहिरे,उदय गोसावी, प्रफुल्ल अहिरे,अनिल बच्छाव,अमोल देवरे,संदीप गलांडे आदी उपस्थित होते.
काय आहे अपघात सानुग्रह अनुदान योजना ?
एखाद्या अपघातामुळे शेतकरी मृत्यू पावला किंवा त्यास अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. या संकटातून सावरण्यासाठी राज्य शासनाने स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील खातेदार नसलेला कोणताही एक सदस्य म्हणजेच शेतकऱ्याची आई वडील पती-पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती अशा १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना अपघाती संरक्षण दिले जाते. रस्ता,रेल्वे अपघात,पाण्यात पडून मृत्यू,जंतुनाशके फवारणी करताना विषबाधा,विजेचा धक्का,वीज पडून मृत्यू ,उंचावरून पडून मृत्यू,सर्पदंश किंवा विंचू दंश,जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू,खून व अन्य नैसर्गिक अपघात यांचा या सानुग्रह अनुदानासाठीच्या पात्रतेत समावेश होतो. अपघातात एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपये व दोन अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास किंवा अपघातामुळे मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान शासनाकडून देण्यात येते.