लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. बंदरे, खनिकर्म तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निर्मिती होईल, अशी ग्वाही दिल्यामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे.

भुसे यांच्या संकल्पनेतून शहर व तालुक्यातील शंभर जेष्ठ नागरिकांची सहल नुकतीच मुंबईत नेण्यात आली होती. या निमित्ताने ज्येष्ठांना विधान भवनाची सफर घडवून आणण्यात आली. तसेच विधान परिषद सभागृहात आमदार आसनस्थ होत असलेल्या बाकांवर बसवत सभागृहाचे कामकाज कसे चालते, याची माहिती ज्येष्ठांना करुन देण्यात आली. यावेळी आपण जणू काही आमदार आहोत, अशी अनुभूती घेतलेले ज्येष्ठ नागरिक अक्षरश: भारावून गेले. त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे भुसे यांचे आभार मानणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा… नाशिक: लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

संस्थेचे अध्यक्ष डी. आर. हिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी हिरे व माजी अध्यक्ष निंबाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन भुसे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना काही ज्येष्ठांनी गेली चार दशके प्रलंबित मालेगाव जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाविषयी खंत व्यक्त करत भुसे यांच्या माध्यमातून ही मागणी पूर्णत्वास यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा धागा पकडत जिल्हा निर्मितीचे मालेगावकरांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होईल, अशा शब्दात भुसे यांनी आश्वस्थ केले.

हेही वाचा… नाशिक : पाणी टंचाईची झळ; ६६ गावे, ५१ वाड्यांना टँकरने पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष खंगरे,वसंत भुसे,डॉ.टी. पी.देवरे,माधवराव निकम, नवलसिंग पवार,अनिल पाटील, हिरालाल मुथ्था, शांतीलाल बाफना,नलिनी माळी यांनी यावेळी सहलीदरम्यान आलेल्या अनुभवांचे कथन करत हे अनुभव ज्येष्ठांना ऊर्जा देणारे असल्याचा उल्लेख केला. नाना इंगळे, विक्रम पवार, प्रभाकर वारुळे, केवळ हिरे, शंकरराव सूर्यवंशी, पंडितराव माळी, पी.टी. वाघ, डॉ. मंगला देवरे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कांकरिया यांनी तर देविदास वाल्हे यांनी आभार मानले.