नाशिक : त्र्यंबक नगरीत दर्शनासाठी आलेल्यांची वाहन प्रवेशाच्या नगरपालिका शुल्कापासून वाहनतळ, देणगी दर्शन, प्रसाधनगृह आदी व्यवस्थेत आर्थिक, मानसिक पिळवणूक होत असल्याची तक्रार गुजरातमधील भाविकाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. टळटळीत उन्हात चार तास दर्शनासाठी धडपड केली. मात्र, एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्यक्ष दर्शन न घेता संबंधित भाविक माघारी फिरला. या काळातील अनुभवांचे संदर्भ देत संबंधिताने समस्त भाविकांना त्र्यंबकेश्वरमध्ये मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याकडे लक्ष वेधले.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढत आहे. काही विशिष्ट पूजाविधी येथे होतात. त्यासाठी देशभरातून भाविक येतात. परंतु, या नगरीत सोयी-सुविधांचा अभाव, दर्शनास लागणारा वेळ, जागोजागी आर्थिक पिळवणूक अशा अनेक बाबी सूरत येथील व्यावसायिक कांजीभाई भरवाड यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या. भरवाड हे अलीकडेच कुटुंबियांसह त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते. त्यांच्या वाहनाकडून शहरात प्रवेश करताना ३५० रुपये नगरपालिका शुल्क म्हणून घेतले गेले. नगरपालिकेची मूळ पावती कमी रकमेची होती. शहरात प्रवेश केल्यावर त्यांनी वाहनतळ शोधण्यास सुरुवात केल्यावर स्थानिक युवकांनी वाहनतळाचे ३५० रुपये सांगितले. त्यांनी त्या ठिकाणी वाहन उभे केले नाही. दुसऱ्या रस्त्याने गेल्यावर एका पोलिसाने २०० रुपयांची पावती दिली. ही पावती खासगी वाहनतळावर चालली नाही. तिथे अधिकचे पैसे मागितले गेले. हे संबंधितांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी भरवाड यांना वाहन रस्त्यालगत उभे करायला सांगितले.

त्र्यंबकेश्वर देवस्थानने २०० रुपये भरून देणगी दर्शनाची व्यवस्था केली आहे. यासंबंधीची पावती मिळविण्यासाठी मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर केंद्र होते. तिथेही भलीमोठी रांग होती. देणगी शुल्क भरूनही सामान्य रांगेतच उभे रहावे लागणार असल्याचे सांगितले गेले. ती रांग मंदिरापासून बाजारापर्यंत गेली होती. हजारो लोक भरउन्हात रांगेत उभे होते. दर्शनास पाच ते सहा तास लागतील, याचा अंदाज आल्याने भरवाड यांनी मंदिराबाहेरून दर्शन घेत परतण्याचा निर्णय घेतला. परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. प्रसाधनगृह नव्हते. मागील बाजूला काही अंतरावर असलेल्या प्रसाधनगृहात पैसे मोजूनही अस्वच्छतेचे साम्राज्य होते. आपल्या कुटुंबात लहान मुले नव्हती. पण लहानग्यांना घेऊन आलेल्या भाविकांना देवाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा असल्याची स्थिती भरवाड यांनी प्रशासनासमोर मांडली.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवसभरात अधिकतम १५ ते १७ हजार जणांना दर्शन घेता येते. सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या प्रचंड वाढल्यानंतर अडचणी उद्भवतात. भाविकांची खासगी मार्गदर्शकामार्फत (गाईड) दिशाभूल केली जाऊ शकते. सामान्य दर्शन रांग पूर्वदरवाजाकडून असते. त्या ठिकाणी १६ प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून मंदिर प्रांगणात उष्णताशोषक आच्छादनाची (मॅट) व्यवस्था केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कुशावर्त तीर्थ या मार्गावर पांढरा रंग मारून उन्हाचा कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेतली जाणार आहे. मंदिरात वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी पुरातत्व विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे.रुपाली भुतडा (विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान)

नगरपालिकेकडून विहित शुल्काची आकारणी केली जाते. कुठलेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. खासगी मार्गदर्शकांकडून भाविकांची दिशाभूल केली जाते. नगरपालिकेने वाहनतळाची व्यवस्था केलेली आहे. उन्हामुळे भाविकांना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत त्र्यंबकेश्वर देवस्थानशी पत्रव्यवहार केला जाईल. श्रेया देवचक्के (मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपालिका)