नंदुरबार : वारंवार निदर्शने आणि उपोषण करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाजाचे आंदोलक गुलाब मराठे यांनी पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावल्याने अनर्थ टळला. या घटनेवरुन आरक्षणाच्या मुद्यावरुन नंदुरबार जिल्ह्यातील मराठा आंदोलक आक्रमक होऊ लागल्याचे दिसत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या लढ्याला नंदुरबारमधून पाठबळ देणारे उमर्दे खुर्द गावातील आंदोलक गुलाब मराठे अल्पावधीत सर्वांना परिचीत झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठे यांनी तीन वेळा शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले होते. या तीन आंदोलनांमध्ये एकदा नऊ दिवसांचे, दुसऱ्यांदा १२ दिवसांचे उपोषण आणि तिसऱ्यांदा ४० दिवसांचे साखळी उपोषण त्यांनी केले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठे यांनी आत्मदहनाच्या इशाऱ्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. २५ फेब्रुवारीपर्यंत याबाबत काही सकारात्मक निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा मराठे यांनी दिला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी उमर्दे गावात चोख बंदोबस्त ठेवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळपासूनच मराठे यांचा शोध घेतला जात होता. पोलिसांना मिळून न आलेले मराठे सकाळी साडे अकराच्या सुमारात उमर्दे गावातील बस स्थानक परिसरात अचानक आले. त्यांनी आपल्या खिशातील पेट्रोलने भरलेली बाटली काढून पेट्रोल अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ त्यांना पकडले. मराठे यांच्याकडील पेट्रोलची बाटली हिसकावून पोलिसांनी त्यांना बस स्थानक परिसरातील बाकड्यावर बसवून नंतर त्यांना ताब्यात घेतले. या नाट्यमट घडामोडीनंतर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठे यांनी आपण आता माघार घेणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान मराठे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा संघर्षाच्या वाटेवर जातांना दिसून येत आहे.