जळगाव : दांडगा जनसंपर्क ठेवून भरपूर विकास कामे केली. अनेक लाभाचे कार्यक्रम राबविले. काय नाही केले. पक्षाचे वातावरण चांगले होते. एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना बरोबर होती. त्यानंतरही जळगाव ग्रामीणमधील विधानसभेची निवडणूक सोपी नव्हती. आपल्याला खूप तणाव आला होता, अशी कबुली शिवेसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी धरणगाव तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पिंप्री खुर्द येथे झाला. त्याठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणुकीतील अनुभव सांगितला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती होईल किंवा नाही होईल, ते वरच्या पातळीवर ठरेल. पक्षाचा आदेश आपल्याला मान्य असेल. युती झाली किंवा नाही झाली तरी तुम्ही तयारीत असले पाहिजे. जिल्हा परिषदेची निवडणूक सहजपणे निवडून याल असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. सर्वांनी शांततेत विचार करा. एवढे हवेत राहु नका, असा इशारा त्यांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना दिला.

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी सदस्य नोंदणीवरून शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची चांगलीच कानउघाडणी केली. तुम्ही सदस्य नोंदणी करणार नाही तर मग काय आम्ही करायची का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी संताप व्यक्त केला. एक गुलाबराव पाटील गेला तर पक्ष थांबून जाणार नाही, लगेच दुसरा गुलाबराव पाटील येईल. कोणाच्या येण्याने आणि जाण्याने पक्षाचे काम थांबत नाही. आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतो. आणि तुम्ही जर पक्षासाठी काम करत नसाल तर तुमच्या मनाला थोडीफार वाटली पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काम करायचे नसेल तर खुर्ची खाली करा, असे देखील त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुनावले. ज्याचे कार्यकर्ते मजबूत त्याचा बूथ मजबूत आणि त्याचा पक्ष मजबूत मानला जातो. त्यामुळे सर्वांनी शिंदे गटाच्या सदस्य नोंदणीसाठी सक्रीय योगदान द्यावे. मी जळगाव जिल्ह्याचा दोनवेळा पालकमंत्री आणि पाच पंचवार्षिक आमदार राहिलो आहे. प्रत्यक्षात माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदे गटाची सदस्य नोंदणी जेमतेम १७ हजार इतकीच झाली आहे. ज्यामुळे माझी नाही तर तुमची मान खाली गेल्याचे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.