जळगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण असताना, पूर्वसंध्येला गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “हर करम अपना करेंगे, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए ” हे गीत सादर करून संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर संधी मिळेल तेव्हा कव्वाली, गाणी, लावणी सादर करण्यासह मिरवणुकीत ठेका धरण्यासही ते बऱ्याच वेळा मागे पुढे पाहत नाहीत. त्याची प्रचिती गुरूवारी अल्पबचत भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित “हर घर तिरंगा” संगीतमय सोहळ्यात देखील आली. जिल्हाधिकारी कार्यालयासह परिवर्तनची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री पाटील यांच्यासह जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आवर्जून उपस्थित होते.

परिवर्तनचे कलावंत गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणिक कुलकर्णी, भूषण गुरव, वरुण नेवे, मुकेश खैरे, डॉ. सोनाली महाजन, अंजली पाटील, रोहित बोरसे, यश महाजन आणि अक्षय दुसाने यांनी देशभक्तीपर गीतांची मैफल सादर केली. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही देशभक्तीपर गीत गाण्याचा आग्रह उपस्थितांकडून करण्यात आला. तेव्हा फार आढेवेढे न घेता त्यांनी थेट मंचावर जाऊन माईक हातात घेतला.

या प्रसंगी कर्मा चित्रपटातील गाजलेले “हर करम अपना करेंगे, दिल दिया है जान भी देंगे” हे गीत सादर करून त्यांनी संपूर्ण सभागृहाला थक्क करून सोडले. त्यांची ती अदाकारी पाहुन उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. राजकारणाचा व्याप सांभाळून त्यांनी जोपासलेल्या गायन कलेचे सुद्धा कौतूक करण्यात आले. परिवर्तन संस्थेचे शंभू पाटील यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमाला वेगळी उंची दिली. देशभक्तीपर गीतांच्या सादरणीकरणाने पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामाचा जाज्वल्य इतिहास उपस्थित सर्वांनी अनुभवला.