जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या भाषणांमधून नेहमीच चौफेर फटकेबाजी करताना दिसून येतात. बोलण्याच्या ओघात बऱ्याच वेळा ते आतल्या काही गोष्टी बाहेर आणण्यास सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. राज्यसभेचे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जळगावमधील नागरी सत्काराच्या कार्यक्रमातही त्याची प्रचिती आली. निकम यांनी माझ्यासाठी तेव्हा एक फोन केल्यामुळे काय घडले होते, याचा गौप्यस्फोट करून त्यांनी खळबळ उडवून दिली.

राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांचे रविवारी सायंकाळी जळगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विशेष प्रसंगी जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी उशिरा भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांनी ॲड. निकम यांचा सन्मान केला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी ॲड. निकम यांच्या न्यायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा केली आणि राज्यसभेतील त्यांच्याकडून अपेक्षित भुमिकेचा उल्लेख केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे सलग तिसऱ्यांदा हाती घेणारे पहिलेच मंत्री आहेत. अशी संधी यापूर्वी जिल्ह्यातील राजकारणात कोणालाच मिळाली नव्हती. २००९ चा अपवाद वगळता पूर्वीचा एरंडोल आणि आताच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून १९९९ पासून ते सातत्याने निवडून येत आहेत. २०१६ मध्ये तत्कालिन महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा त्यांना सहकार राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली होती. त्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांनी मोठा हातभार लावल्याचे सांगून मंत्री पाटील यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४ मध्ये विधाससभेवर निवडून आल्यानंतर आपली मंत्रि‍पदी वर्णी लागावी म्हणून माझे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी गिरीश महाजन यांनाही साकडे घालून पाहिले. मात्र, ते माझा वशिला लावत नव्हते. महायुतीचे सरकार स्थापन होऊन नंतर महाजन आणि एकनाथ खडसे मंत्री झाले. माझा नंबर लागलाच नाही. तरीही मी आशावादी राहिलो. दोन वर्षांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यावर पुन्हा प्रयत्न सुरू केले. शेवटचा उपाय म्हणून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे शब्द टाकून पाहिला. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून माझ्यासाठी काही तरी करा म्हणून सांगितले. त्यानंतर मी थेट सहकार राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असा घटनाक्रम पालकमंत्री पाटील यांनी त्यांच्या भाषणातून सांगितला. त्यास ॲड. निकम यांनीही नंतर दुजोरा दिला.