जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढायच्या की स्वतंत्रपणे, या मुद्द्यावर अद्याप भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) एकमत झालेले नाही. तशात मागील काही निवडणुकांमध्ये झालेली बंडखोरी लक्षात घेता यावेळीही तसा अनुभव आल्यास ते अजिबात सहन केले जाणार नाही, अशी तंबी शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. त्या सोबतच महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून येत असून, युतीच्या समन्वयावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे भाजपशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत देत असतानाच त्यांच्या पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून राजकीय वातावरणात खळबळ माजवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढवल्यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील समन्वय सुरळीत होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे तिन्ही पक्षांमधील मतभेद उघड होताना दिसत आहेत. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी वाटपासह स्थानिक पातळीवरील वर्चस्व आणि संघटनात्मक हितसंबंध, यावरून महायुतीत आणखी जास्त तणाव वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदारांनी मनापासून मदत केल्याने राज्यात सगळीकडे वाईट स्थिती असतानाही जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही महिला खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने गद्दारी केली. शिंदे गटाच्या आमदारांविरोधात बंडखोर उभे करून त्यांना पाठबळ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हा मुद्दा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आता पुन्हा पुढे आणला आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आमदार पाटील यांच्या तक्रारींचे समर्थन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले असले, तरी पाचोरा मतदारसंघात काम केले नसल्याची थेट पुष्टी त्यांनी दिली. पाचोरा येथे आयोजित शिंदे गटाच्या निर्धार सभेत ते बोलत होते.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
माझ्यावरही भाजपने एकदा असाच अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावमधील सभेत गोंधळ घातला होता. पाच वर्षे कोणी मेहनत करत असेल आणि ऐनवेळी कोणी वाटेत अडचणी निर्माण करत असेल तर तो त्याच्या राजकीय करियरचा विषय असतो. आम्ही प्रेम करतो तर मोकळ्या मनाने करतो, काही जण तर ताटात जेवून गद्दारी करतात. कितीही त्रास देणारे येऊ द्या, आम्ही पण कच्च्या गुरूचे चेले नाही आहोत. डोक्यावरील केस गेले म्हणून म्हातारे समजू नका. अजूनही वाघ जीवंत आहे. शिवसैनिक माझ्यातही आहे. परंतु, राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असल्याने मला जबाबदारीने वागावे लागते. मात्र, सध्या जे काही घडत आहे, ते आपण राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
