राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सर्वसामान्यांसह अनेक नेतेमंडळी आणि सेलिब्रेटी मतदानासाठी बाहेर पडले असून मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये मतदाराने दोन्ही हात नसतानाही मतदानाचा हक्क बजावत लोकशाही अद्यापही जिवंत असल्याचं उदाहरण दिलं आहे. दोन्ही हात नसल्याने मतदाराच्या पायाला शाई लावण्यात आली.

बाजीराव मोजाड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. २००८ रोजी शेतात काम करत असताना एका अपघातात त्यांनी आपले दोन्ही हात गमावले होते. आज एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना, बाजीराव मोजाड यांनी कोणतंही कारण न देता आपलं कर्तव्य पार पडलं. बाजीराव मोजाड यांचा हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. बाजीराव मोजाड यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या पायाला शाई लावण्यात आली.

राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

९६ हजार मतदान केंद्रे
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१सव्‍‌र्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.