धुळे: सात वर्षांपूर्वी ग्रामपंचायतमध्ये समावेश असलेले हरणमाळ (ता. धुळे) गाव आता प्रशासकीय अभिलेखावरून आश्चर्यकारकपणे हरविले आहे. यामुळे ग्रामस्थांना शासनाच्या कुठल्याच योजनेचा लाभ घेता येत नाहीये. लोकसभेसह सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या गावचे लोक मतदानाचा हक्क बाजावू शकतात हे दुसरे आश्चर्य.
धुळे तालुक्यातल्या हरणामाळ या गावचा इतिहास आणि भूगोलही जणू बदलला आहे.धुळे शहराची हद्दवाढ झाल्यानंतर अख्खे गाव शासनाच्या अभिलेखावरून जणू गायब झाले आहे.या नव्या समस्यांमुळे हरणमाळ ग्रामस्थ सर्वच शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत.
गावाची जबाबदारी ना महापालिका घेत ना कुठली ग्रामपंचायत. गेल्या सात वर्षापासून हे गाव आपल्या अस्तित्वासाठी आणि न्याय मिळावा यासाठी संघर्ष करीत आहे.मात्र, शासनाच्या कानापर्यंत त्यांचा आवाज अद्यापही पोहोचलेलाच नाही. सुविधा मिळत नसल्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांमुळे संपूर्ण गावाने आता आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान,आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
गावाला गेल्या सात वर्षांपासून गावात सरंपच नाही, ग्रामसेवक, तलाठी वा कोतवालही नाही.यामुळे रहिवासी दाखले, सातबारा उतारे मिळत नाही, कोणतेही शासकीय कागदपत्रेच मिळत नसल्याने गावातील विधवा महिलांनाही शासनाकडून निराधार योजनेचा लाभ मिळत नाही. अशा अनेक योजनांपासून ग्रामस्थ वंचित आहेत. गावात चांगला रस्ते नाही की बेघर योजनेचा लाभ नाही. सार्वजनिक स्वच्छता गृह नाहीच, पण इयत्ता चौथीच्या पुढच्या वर्गाची शाळाही नाही.
वास्तविक, हरणमाळ हे ब्रिटिशकालीन गाव आहे. हे गाव २०१८ मध्ये नकाणे ग्रुप ग्रामपंचायतचा भाग होते.परंतु, मोराणे (ता.धुळे) हद्दवाढीत मनपाला संलग्न झाल्याने हरणमाळचे अस्तित्व शासन दरबारी पूर्णपणे हरविले आहे.या नव्या समस्यांमुळे ‘आम्ही भारताचे नागरीक आहोत की नाही’ हा प्रश्नही ग्रामस्थांना पडला आहे. गावकरी हे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका हद्दीत मतदान करतात. परंतु, कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या गावाला दिलासा दिलेला नाही. सातत्याने मागण्या मांडल्या जातात.जेंव्हापासून ही नवी समस्या निर्माण झाली तेंव्हापासून जवळपास सहा जिल्हाधिकारी बदलले, पण ग्रामस्थांची ही समस्या सोडविली गेलेली नाही.
परिणामी,आगामी काळातील निवडणुकांवर बहिष्कार टाकू आणि आत्मदहन करु असा इशारा निलेश ढालवाले, रविंद्र सोनवणे, सचिन गायकवाड, नाना मालचे, बादल मालचे, संतोष मालचे, आकाश अहिरे, किशोर मालचे, युवराज ठाकरे, एस.ए. ढवळे, जंगलसिंग गायकवाड, वनाजी मालचे, तानाजी मालचे, सुकदेव धना गायकवाड, प्रशांत गायकवाड, कैलास मालचे, प्रकाश सोनवणे, राहूल मालचे, बापू मालचे, अनिल ठाकरे आदींनी दिला, तसे लेखी निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले.
शासनाच्या कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने आम्ही भारताचे नागरिक आहोत, की नाही? असा प्रश्न पडला आहे. गावाला नां सरपंच नां तलाठी, कोतवालही नाही. कुठला शासकीय दाखला हवा असल्यास कुणाकडून मागावा. आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकूच, पण प्रसंगी आत्मदहनही करायला मागेपुढे पाहणार नाही. – निलेश ढालवाले, माजी सदस्य, मोराणे (ता.धुळे) ग्रामपंचायत)