जळगाव : पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तापीसह वाघूर, गिरणा आणि अन्य बऱ्याच नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. आवक वाढल्यानंतर हतनूर धरणाचे सहा दरवाजे आता पूर्णपणे, तर १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. ज्यामुळे तापीच्या पात्रात सुमारे ६४ हजार ७३२ क्यूसेकने विसर्ग होत आहे.

जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारलेली असली तरी पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस होत असल्याने एकमेव हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसत होते. दरम्यानच्या काळात पाण्याची आवक थोडी कमी झाल्याने हतनूरचे बहुतांश दरवाजे बंद करून केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले. मात्र, आता पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने हतनूरचा उपयुक्त पाणी साठा झपाट्याने वाढताना दिसून आला आहे. पाटबंधारे विभागाला त्यामुळे सहा दरवाजे पूर्णपणे आणि १४ दरवाजे एक मीटरने उघडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सद्यःस्थितीत हतनूर धरणाचे ४१ पैकी २० दरवाजे उघडे असून, तापीच्या पात्रात ६४ हजार ७३२ क्यूसेकपेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे. पुढील काही तासांत ७० ते ८० हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग हतनूर धरणातून सोडला जाण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीत नदीच्या काठावरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर हतनूरच्या विसर्गात पुढील तासात आणखी वाढ केली जाऊ शकते. दरम्यान, हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर तापीवरील शेळगाव बॅरेजचे १० दरवाजे अर्धा मीटरने तसेच आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ज्यामुळे शेळगाव बॅरेजमधून सुमारे ५० हजार ४९४ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर सोमवारी दुपारपर्यंतच्या चार तासात सुमारे १९८.८ मिलीमीटर (सरासरी २२.१ मिलीमीटर) पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. पैकी बऱ्हाणपुरात १०.४, देढतलाईत ४१.०, एरडीत १३.०, गोपालखेड्यात ४३.६, लखपुरीत ४८.८, लोहाऱ्यात २३.४ आणि अकोल्यात १८.६ मिलीमीटर पाऊस पडला. हतनूर धरणातील विसर्ग वाढल्याच्या स्थितीत तापी आणि पूर्णा नदीच्या काठावर राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीच्या पात्रात न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच जनावरांना पाणी पिण्यास घेऊन जाणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.