नाशिक: मंगळवारी सायंकाळी शहरासह ग्रामीण भागास पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. अनेक भागात झाडे व फांद्या पडल्या. प्रमुख रस्ते व चौकात पाणी साचल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. गंगापूर रोड, पंचवटीतील अमृतधाम परिसर, सिडको आदी भाग रात्री उशिरापर्यंत अंधारात बुडाले होते. ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरांचे पत्रे उडाले. सिन्नर तालुक्यात सोनगिरी येथे वीज पडून ३४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवली होती. मंगळवारचा दिवसही त्याला अपवाद राहिला नाही. तीन तासात शहरात ३०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अल्पावधीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे पेठ रोड, दिंडोरी रस्त्यासह शहरातील अनेक प्रमुख रस्ते व चौकांना तलावाचे स्वरुप झाले. अमृतधाम, रेडक्रॉस, शालीमार, डिसुझा कॉलनी आदी १२ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या. यामुळे सायंकाळी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. डिसुझा कॉलनीत पडलेल्या झाडाखाली मोटार सापडली. सुदैवाने वाहनात कुणी नसल्याने प्राणहानी झाली नाही. वादळी पावसाने महावितरणच्या वाहिन्या व यंत्रणांचे नुकसान झाले. परिणामी, अनेक भागात सहा ते सात तास वीज पुरवठा खंडित होता. सिन्नर, नांदगाव, निफाड, नाशिक तालुक्यात वादळी पाऊस झाला.

वीज पडून एकाचा मृत्यू

सिन्नर तालुक्याती ल सोनगीर येथील रवींद्र बोडके (३४) यांचा वीज पडून मृत्यू झाला. कळवण तालुक्यात भेंडी गावात शांताराम साळवे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. नांदगाव येथे बाळू मेंगाळ यांचा बैल वीज पडून मृत्यू झाला.

पावसामूळे आतापर्यंत ७५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तब्बल एक हजार ८२ घरांची पडझड झाली. त्र्यंबकेश्वर, बागलाण, सुरगाणा तालुक्यात रस्ते, पूल आदी नऊ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाल्याचे सांगितले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज यंत्रणेची हानी

आकस्मिक आलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात मोठी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. यंत्रणेवर पडलेली झाडे, फांद्या बाजूला काढून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंते जनमित्र व कर्मचारी कार्यरत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. जिल्हा रुग्णालय विद्युत उपकेंद्रातील झाड कोसळल्याने संपूर्ण उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला. तशीच स्थिती घारपुरे घाट, पंचवटी पोलीस ठाण्यासमोर, म्हसोबा मंदिर समोर झाड पडल्याने झाली. दिंडोरी रोडवरील एकतानगर, सद्गुरु नगर, सातपूर एमआयडीसीमधील नाइस आणि कॉलेज रोडवरील विशाल पॉईंटजवळ विद्युत यंत्रणेवर झाड पडल्याने गंगापूर रोडवरील वीज पुरवठा खंडित झाला. बळवंत नगर, मखमलाबाद, चांदशी गाव येथेही झाडे पडल्याने वीज पुरवठा प्रभावित झाला आहे.