जळगाव – जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था खूपच नाजूक झाली होती. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात असताना, शुक्रवारी रात्री जिल्हाभरात जोरदार पावसाने हजेरी लावली. आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातही घरांसह दुकानांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाल्याने खरिपाची पेरणी मूळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असताना नेमकी पावसाने पाठ फिरवल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेली पिके नाजूक स्थितीत पोहोचली होती. पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीसह किटकनाशकांची फवारणी आणि रासायनिक खतांचा डोस देण्यासारखी कामेही तात्पुरती थांबवली होती. पावसाअभावी वाढीच्या तसेच फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला होता. दमदार पावसाअभावी नदी-नाले वाहून निघाले नसताना, विहिरींसह कूपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ झाली नव्हती.

पुरेशा पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागला. त्यासाठी बरेच शेतकरी ठिबक, तुषार सिंचनावर भर देत होते. पाण्याची कोणतीच सोय नसलेल्या शेतकऱ्यांवर मात्र आभाळाकडे पाहण्याची वेळ आली होती. सुदैवाने महिनाभराच्या खंडानंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला. एरंडोलसह पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आणि रावेर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. परिणामी, बऱ्याच ठिकाणी कच्च्या मातीच्या घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी नाल्याच्या काठावरील घरांसह दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले. संबंधितांचे मोठे नुकसान त्यामुळे झाले. अनेकांना रात्र जागून काढावी लागली.

शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यास आलेल्या पुरामुळे परिसरातील अनेक दुकानांमध्ये शुक्रवारी रात्री पाणी शिरले. किराणा दुकानांमधील साहित्य पाण्यात भिजल्याने संबंधितांना मोठा आर्थिक फटका बसला. शनिवारी सकाळी पालकमंत्री पाटील यांचे पूत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील तसेच धरणगावचे तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी नुकसानीची एकत्र पाहणी करून संबंधित सर्व नागरिकांना धीर दिला. याशिवाय, महसूल विभागाला नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. यापूर्वी, अनेक वेळा पावसाचे पाणी शिरल्याने पाळधीत घरांसह दुकानांचे आणि पोलीस ठाण्याचे नुकसान झाले आहे. आधीच वाढत्या अतिक्रमणामुळे सदरचा नाला अरूंद झाला आहे. त्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यातील गाळ काढण्याची तसदी ग्रामपंचायत प्रशासन घेत नाही. या कारणाने पाळधीत नाल्याचे पाणी शिरण्याचे प्रकार दरवर्षी अतिवृष्टीनंतर घडत असल्याचे दिसून येते.