नाशिक : नाशिकसह राज्यातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील अश्व बाजारावर झाला आहे. दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी येथे अश्व विक्रीस आणतात. देशभरातील अश्व शौकीन खरेेदीसाठी येतात. अतिवृष्टीमुळे यंदा बाजारात अश्वांची आवक घटली आणि त्याचा परिणाम त्यांच्या किंमती उंचावण्यात झाल्याचे चित्र आहे.

येवल्यातील अश्व बाजाराला ३५० वर्षांची परंपरा आहे. दर मंगळवारी या ठिकाणी हा बाजार भरतो. वर्षभर नियमितपणे भरणारा हा देशातील एकमेव अश्व बाजार आहे. दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारचा सर्वात मोठा बाजार असतो. देशभरातून मारवाड, काठेवाड, गावराण, भिमथडी. सिंधी अशा विविध जातीचे अश्व या ठिकाणी विक्रीस येतात. देशभरातील व्यापारी आणि ग्राहक, घोड्यांचे शौकीन यांची मोठी गर्दी उसळते. कोट्यवधींची उलाढाल होते. दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी येवल्यातील बाजारात दरवर्षी दिसणारे हे चित्र यावेळी बदलले आहे

मागील आठवडाभरात राज्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. नाशिक जिल्हा त्यास अपवाद नव्हता. यामुळे बाजारात अश्वांची संख्या रोडावल्याचे बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी नमूद केले. बाजारात १० हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंतचे अश्व असतात. गतवर्षी या दिवशी लहान-मोठे सुमारे दीड हजार अश्व आले होते. यावेळी ही संख्या निम्म्याने कमी झाल्याचा अंदाज आहे. पिढीजात या व्यवसायात असणारे पप्पू गांगुर्डे यांनी यंदा अश्वांची संख्या बरीच कमी घटल्याने किंमती वाढल्याचे नमूद केले. ग्राहकांना अधिक किंमत देऊन ते खरेदी करावे लागले. कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, हैद्राबाद. मध्यप्रदेश, माथेरान, मुंबई, पुणे आदी भागातील व्यापारी, ग्राहक आले. आवक कमी असल्याने बाजारात आलेल्या अश्वांना चांगली किंमत मिळाली. मारवाड जातीच्या पांढऱ्या शुभ्र अश्वाला एका ग्राहकाने साडेतीन लाख रुपये किंमत मोजल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.

किंमत कशी ठरते…?

बाजारातील काही व्यापारी गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पुष्कर, पंजाब आदी भागातून वाहनांद्वारे अश्व आणून या बाजारात सहभागी होतात. या ठिकाणी साधारणत १०० ते १५० व्यापारी असतात. विविध प्रकारचे अश्व खरेदीसह पाहण्यासाठी या दिवशी गर्दी होते. अतिवृष्टीमुळे यंदा बाजारात अनेकांना अश्व आणता आले नाही. गतवर्षी बाजारात मोठी उलाढाल झाली होती. अश्वांच्या किंमती जात, उंची, व्यक्तिमत्व यावर ठरते. हा सर्व नजरेचा खेळ असतो. जो अश्व चांगला, दमदार दिसतो, त्यासाठी शौकीन कितीही किंमत देण्यास तयार होतात, असे व्यापारी सांगतात. मारवाड जातीच्या अश्वांची सर्वाधिक म्हणजे ३० हजारापासून ते तीन, चार लाखापर्यंत किंमत असते. त्या खालोखाल काठेवाडी जातीच्या अश्वांना चांगली किंमत मिळते. भिमथडी या अश्वालाही १० ते ५० हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.