जळगाव – मंत्री गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा हा एकनाथ खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल केले. त्यानंतर खडसे यांनीही आता महाजन यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. छायाचित्रातील गाडीत मीच बसलो आहे आणि लोढा रस्त्यात फुले देऊन माझेच स्वागत करत आहे. मात्र, तेव्हा लोढा मला तुमच्या कारनाम्यांची सीडी देणार होता. ज्यामुळे पुढे जाऊन तुम्ही उघडे पडला असता, असा टोला खडसे यांनी महाजन यांना हाणला आहे.

प्रफुल्ल लोढाशी संबंधित हनी ट्रॅपसह इतर गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी गाजत असतानाच एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या जोरदार शाब्दीक युद्ध सुरू झाले आहेत. लोढाशी संबंध असल्याचा आरोप करत दोघेही एकमेकांवर टीकेची झोड उठवण्यात धन्यता मानत आहेत. याच दरम्यान, काही जुने व्हिडीओ आणि छायाचित्रे समोर आणत दोघेही एकमेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तशात मंत्री गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित लोढा हा मोटारीत बसलेल्या एकनाथ खडसे यांना गुलाबाची फुले देतानाचे जुने छायाचित्र समोर आणत कडी केली आहे. त्यासोबतच तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होत असल्याची टीकाही मंत्री महाजन यांनी खडसे यांच्यावर केली आहे.

गिरीश महाजन यांनी गुरूवारी सकाळी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचे ते छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल केले. त्यानंतर खडसे यांनीही शांत न बसता महाजन यांना समाज माध्यमावर त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. तुम्ही जे छायाचित्र व्हायरल केले, त्यामध्ये गाडीत मीच बसलो आहे. आणि प्रफुल्ल लोढा हाच आपले रस्त्यात गुलाबाची फुले देऊन माझे स्वागत करत असल्याचे खडसे यांनी मान्य केले आहे. तसेच तेव्हा लोढा मला तुमच्या कारनाम्यांची सीडी देणार होता. ज्यामुळे पुढे तुम्ही उघडे पडणार होता, असा दावा खडसे यांनी केला आहे. त्या सीडीचा धोका ओळखूनच तुम्ही लोढा याची ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन महिने सेवा केली. त्याची मनधरणी केली आणि त्याला पुन्हा पक्षात घेतले, असेही खडसे यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या मुलाच्या मृत्यूबाबत तुम्ही बोलता. जर तुमच्यात हिम्मत असेल आणि तुमची दिल्लीत पत असेल तर सरळ सीबीआय चौकशी होऊन जाऊ द्या. दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असेही आव्हान खडसे यांनी दिले आहे. बीएचआरमध्ये जर ठेवीदारांच्या पावत्यांचे सेटलमेंट करुन कर्ज भरणारे दोषी असतील, तर रकमेच्या बदल्यात ७० टक्के ठेवींच्या पावत्या जमा करुन लिलावात कवडीमोल भावाने संपत्ती घेणारे तितकेच दोषी नाहीत का? असा प्रश्न देखील खडसे यांनी महाजन यांना उद्देशून उपस्थित केला आहे.