जळगाव – जम्मू-काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीचा कोणताच विपरीत परिणाम व्यापारावर न झाल्याने केळीला देशांतर्गत मागणी कायम आहे. दुसरीकडे, आखाती देशांमधील निर्यातीलाही अलिकडे चांगली चालना मिळाली आहे. या कारणाने अचानक तुटवडा निर्माण झाल्याने खान्देशात उत्पादित होणाऱ्या केळीच्या भावात आठवडाभरातच मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. संबंधित केळी उत्पादकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरपासून ते गुजरातमधील अंकलेश्वरपर्यंत केळीची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते. याच भागातील नंदुरबार, तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा आणि यावल या तालुक्यातील नवती केळीचा पहिला टप्पा कापून झाला असून, जवळपास ६० टक्के माल संपला आहे. मुक्ताईनगरसह सावदा परिसरातील केळीही अर्धीअधिक संपली आहेत.

सद्यःस्थितीत रावेर आणि बऱ्हाणपूर भागातून तुरळक केळीची आवक सुरू आहे. काही गावातील केळीची आवक १५ जूननंतर सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळेही केळीचे बरेच नुकसान झाले आहे. अशा या परिस्थितीत तयार मालाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केळीच्या भावात अचानक मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आठवडाभरापूर्वी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात केळीला १३०० ते १८५०, सरासरी १६५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता. गुरुवारी तिथे केळीला १४०१ ते २९६२, सरासरी २३८६ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. एकूण चित्र लक्षात घेता उच्च दर्जाच्या केळी भावात ११०० रुपये आणि सरासरी भावात ७५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

दररोज १५ ते २० कंटेनर केळीची निर्यात

भारतातून इराक, इराण, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि ओमान आदी काही देशांमध्ये नियमितपणे केळी निर्यात होत असते. त्यात खान्देशातील जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा मोठा वाटा असतो. खान्देशातून दररोज १५ ते २० कंटेनर (प्रत्येक कंटेनर २० टन) केळीची आखाती देशांमध्ये सध्या समुद्री मार्गाने निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी निर्यातदारांना केळी देण्यास पसंती देत आहेत.

साधारण आठ दिवसांपूर्वी केळीला १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळत होता. मात्र, मालाची कमतरता निर्माण झाल्यानंतर केळीचे भाव अल्पावधीतच २५०० रुपयांवर गेले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढण्याची वाट पाहण्यापेक्षा सध्याच्या भावात केळीची काढणी करणे योग्य आहे. – मुकेश पाटील (सचिव, वामनरावभाऊ पाटील सहकारी फळ विक्री संस्था, चोपडा, जि. जळगाव)