नाशिक : .आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या शासकीय धानाची परस्पर गुजरातमध्ये विक्री करून अपहार केल्या प्रकरणी सिन्नरच्या पांढुर्ली येथील रेणुका राईस मिलचे संचालक राहुल भागवत व ठेकेदार, वाहनमालक सौरभ राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या मीलला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.
नाशिक प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत सुरगाणा तालुक्यात खरेदी केलेले धान्य भरडाईसाठी राईस मिलला दिले जाते. हे धान्य मीलमध्ये न नेता परस्पर गुजरातमध्ये नेऊन काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात चौकशी समितीने केलेल्या चौकशीत तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. पांढुर्ली येथील रेणुका राईस मीलने आदिवासी विकास महामंडळाशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले.
आधारभूत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२४-२५ मधील धानाची भरडाई न करता परस्पर गुजरात राज्यात विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यात मील संचालकासह वाहतूक ठेकेदारावर ठपका ठेवला गेला. रेणुका राईस मीलचे संचालक राहुल भागवत, वाहतूक ठेकेदार सौरभ राऊत (ननाशी. सुरगाणा) यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिले. रेणुका मीलशी झालेला करारनामा रद्द करून त्यांची बँक गॅरेंटी जप्त करून त्यांच्याकडे प्रलंबित तांदुळाची रक्कम केंद्राने निश्चित केलेल्या दराच्या सव्वा पट वसूल करावी आणि या मीलला काळ्या यादीत टाकण्याचे सूचित करण्यात आले.