नाशिक: सातपूर विभागातील गंगापूर रोड, जेहान सर्कल, बॉबीज हॉटेल या परिसरातील ८२ झाडांची दोन संशयितांनी छाटणी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी महापालिकेच्या वतीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पर्यावरणप्रेमींनी हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.

महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजकांमध्ये सुशोभिकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. यातील काही झाडांच्या देखभालीचे काम हे खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. काही दिवसांपासून गंगापूर रोड, जेहान सर्कल ते बॉबीज हॉटेल या परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्यात येत असल्याची तक्रार स्थानिकांकडून, पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली होती.

कॅलिस्टो हॉटेल, बॉबीज हॉटेल, बेंडकुळे नगर, सावंत पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप, जेहान सर्कल आदी ठिकाणच्या ८२ वृक्षांच्या फांद्या छाटण्यात आल्या. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर याबाबत सातपूर उद्यान विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडून गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला आहे.

गंगापूर रोड परिसरातील अवैध वृक्ष तोडीत एका कंपनीचा हात असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी एका कंपनीने दुभाजकातील झाडे तोडल्याचे लक्षात आल्यावर सदर कंपनीला पर्यावरणप्रेमींनी समजावून सांगितले असता झाड तोडण्याचे बंद झाले होते. सदर ठिकाणची झाडे दहा ते बारा फूट उंच वाढली असून नागरिकांना व्यवस्थित सावली देत आहेत.

इतर कंपन्यांनाही नोटीस व समजावले असूनही संबंधित ठिकाणची झाडे मात्र छाटली जात आहेत. यामागे कंपन्यांनी ज्या कामासाठी जागा मिळवल्या, त्या कामाचे व त्यासाठी महानगरपालिकेबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याने सदर कंपन्यांकडून ताबडतोब सदर जागा काढून घेण्यात याव्यात, कंपन्यांच्या नावांचे फलक काढून घेण्यात यावेत, यासाठी सोमवारी सर्व पर्यावरणप्रेमी महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांना भेटणार आहेत. महानगरपालिकेबरोबर केलेल्या कराराचा भंग करणे, संशस्यास्पद वागणूक आणि झाडांचे नुकसान होत असतानाही महानगरपालिकेस, पोलीस यांना न कळविणे, या कारणामुळे सात दिवसाच्या आत सदर कंपन्यांचे प्रायोजकत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करणार आहेत.

जेहान सर्कल ते बॉबीज हॉटेल या ठिकाणी झाडांची कत्तल सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. वृक्षांच्या देखभालाची जबाबदारी ज्या कंपन्यांना दिली, त्यांनी याआधी छाटणी केली होती. याबाबत याआधी त्यांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, या छाटणीविषयी कंपन्यांमध्ये जाऊन विचारणा केली असता संबंधितांनी ही छाटणी केली नसल्याचे सांगितले. याविषयी परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी केली असता १४ ते १७ एप्रिल या कालावधीत दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. या फांद्या तेथेच टाकून रस्त्याच्या बाजूला फेकल्या आहेत. खोडसाळपणे हा प्रकार कोणीतरी केला आहे. याविषयी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. – भविष्या निकम (उद्यान निरीक्षक, सातपूर)