नाशिक : महागाई भत्ता तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी जिल्ह्यातील सर्व बस आगारात १८ संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय उपोषण केले. या उपोषणाला अन्य कर्मचाऱ्यांनी र्पांठबा दिल्याने प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडली.
आर्थिक समस्या तसेच अन्य कारणामुळे करोना काळात राज्य परिवहनच्या २५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वेतन वेळेवर मिळावे यासाठी कामगार संघटना न्यायालयात गेल्यानंतर दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला नियमित वेतन देण्याचे आदेश असतानाही कार्यवाही झाली नाही.
याशिवाय २८ टक्के महागाई भत्ता द्यावा यासह अन्य मागण्या सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने महामंडळाला दिल्या होत्या. महामंडळाने महागाई भत्त्यात १० टक्के वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे १२ टक्केवरून त्यात १७ टक्के अशी वाढ करण्यात आली. ही वाढ पुरेशी नसल्याने संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या १८ कामगार संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली. कृती समितीच्या माध्यमातून बुधवारी विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. मनमाडसह अन्य आगारात कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने सकाळपासूनच बस ठेवा ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मनमाड आगारातील कर्मचाऱ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणा देत निदर्शने केली. आगारातून दररोज होणाऱ्या २० नियमित फेऱ्या तसेच दररोजच्या ४३ फेऱ्या संपामुळे रद्द करण्यात आल्या.
मनमाड बस आगारातून दररोज पहाटे पाच वाजता सुटणारी मनमाड-पुणे तसेच मनमाड-सुरत, मनमाड-शेगाव ही बससेवादेखील आंदोलनामुळे बाधित झाली. प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मनमाड बस आगाराचे व्यवस्थापक प्रितम लाडवंजारी यांनी दिली. कामगारांचे नेते विजय नाईक यांनीही संपकरी कामगारांची भेट घेऊन त्यांना र्पांठबा दर्शवला. राज्य शासनाने महामंडळ शासनामध्ये विलीन करण्याची मागणी त्यांनी केली.
पिंपळगाव बसवंत बस आगारातही विविध संघटनांच्या संयुक्त कृती समितीने उपोषण केले. उपोषणात संघटनांचे ५० पेक्षा अधिक पदाधिकारी सहभागी झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चालक आणि वाहक या उपोषणात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे बस सेवा सुरळीत सुरू होती . पिंपळगाव आगाराच्या सर्व बसेस धावत होत्या. पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणा देत मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक विभागीय कार्यालया समोरही कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
संपामुळे बुधवारी सकाळी मनमाड बस स्थानकात आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. अनेकांनी खासगी वाहनांचा आधार घेतला. करोनामुळे सध्या रेल्वे प्रवास मर्यादित स्वरूपात सुरू आहे. वेळेवर प्रवास करण्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळत नाही. त्यासाठी अगोदर आरक्षण करावे लागते. त्यामुळे सध्या सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा एसटी बसने प्रवास करण्याकडे ओढा वाढला आहे.