नाशिक: सातबाऱ्यावर फेरफार नोंदणी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या आईवडिलांच्या नावे मोडाळे गावात मिळकत असून मिळकतीचा गाव नमुना, सातबारा अधिकार अभिलेखपत्रक यावर मे. न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्रयस्थ संबंधास प्रतिबंध अशी फेरफार नोंद होती. या दाव्यात निकाल लागून आदेश झाले होते. त्यावरून तक्रारदाराच्या वडिलांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आधीची फेरफार नोंद रद्द होण्यासाठी तहसीलदार आणि संशयित तलाठी योगिता कचकुरे (४२, सोमेश्वर काॅलनी, एबीबी कंपनीजवळ, सातपूर) यांच्याकडे अर्ज केला होता.

अर्जावर कार्यवाही करुन नोंद घेण्याच्या मोबदल्यात योगिता यांनी १० हजार रुपयांची मागणी करुन रक्कम स्वीकारली. वाडीवऱ्हेचा मंडळ अधिकारी दत्तात्रय टिळे ( ३५, रा. भगूर, नाशिक) याने नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची मागणी स्वतः साठी केली. तलाठी योगिताला रंगेहात पकडण्यात आले.

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पथकातील हवालदार गणेश निंबाळकर, संतोष गांगुर्डे, नितीन नेटारे यांनी ही यशस्वी कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सापळा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले.