धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचा येथील एका गुन्हेगाराचा हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करुन त्यास अभय देण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच घेतांना दोंडाईचा येथे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली.

धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी नितीन मोहने आणि अशोक पाटील या दोघांना दोन लाख रुपयांची लाच घेतांना पथकाने दोंडाईचा येथे रंगेहात पकडल्यावर दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचाही या गुन्ह्यात सहभाग आढळून आला. त्यामुळे त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. तिघांची लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी करण्यात आली. तिघांनी तक्रारदाराकडून हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करुन अभय देण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात धुळे लाचलचुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती.

हेही वाचा : माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक

तक्रारीच्या अनुषंगाने कायदेशीर पडताळणीअंती पथकाने दोंडाईचा येथे सापळा रचला. या सापळ्यात तक्रारदाराकडून पोलीस कर्मचारी नितीन मोहने आणि अशोक पाटील या दोघांनी दोन लाख रुपयांची लाच स्विकारताच दोघांना पथकाने रंगेहात पकडले. या लाचखोरीत निरीक्षक शिंदे यांचा देखील सहभाग आढळून आल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर प्राप्त पुरावे व कायदेशीर बाबींची तपासणी केली असता तिघांनीही लाचखोरी केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याअनुषंगाने तिघांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती उपअधीक्षक पाटील यांनी दिली.