धुळे : साक्री तालुक्यातील मालनगांव शिवारात कान नदीच्या काठावर अवैधपणे गावठी दारु निर्मिती करणाऱ्या सहा हातभट्ट्या पोलिसांनी उध्वस्त केल्या. या कारवाईत प्लास्टिकच्या ७० पिंपांसह दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या अधिपत्याखाली एकाच दिवशी ही कारवाई करण्यात आली. कान नदीकाठी गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारा रसायनांचा मोठा साठा मिळून आला. लाकडी बांबुचे नरसाळे, पत्री टाक्या, निळया रंगाचे प्लास्टिकचे ७० पिंप, नळ्या असा मुद्देमाल व साहित्य पोलिसांनी जागीच नष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत आय. एच. काझी, अशोक पाटील, खंडु सोनवणे, अमोल पारोळेकर, प्रणव सोनवणे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.