धुळे : मालमोटार मागेपुढे करतांना चाकाखाली चार वर्षाची बालिका सापडून तिचा मृत्यू झाल्यानंतर शेजारच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात प्रेत टाकून ते मातीने बुजून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांविरुध्द धुळ्यातील मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

१८ मार्च रोजी दुपारी धुळे तालुक्यातील अवधान येथील एमआयडीसीतील उपकेंद्राजवळ ही घटना घडली. मैनाज खातुन (चार वर्षे, रा.प्लाट नं, डब्ल्यू १७, शबनम प्लास्टिक, एमआयडीसी अवधान,धुळे) असे मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी सलाउद्दीन अमिन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मालमोटार मागे पुढे करत असतांना कुठलीही काळजी न घेतल्याने त्यांची मुलगी मैनाज हीस धडक बसल्याने ती चाकाखाली आली. यात ती चिरडली जावून तिचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा…नाशिक : बसमधून मद्य तस्करी; गुजरातच्या वाहक, चालकास अटक

यानंतर मालमोटार चालक हरिओेम गुर्जर आणि राजकुमार रावत (रा. मुरेना, मध्य प्रदेश) यांनी बालिकेचे प्रेत शेजारच्या सांडपाण्याच्या नालीत टाकून त्यावर माती लोटली. मृतदेह बुजवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून सलाउद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.