धुळे – चोरीची दुचाकी विक्री करण्यापूर्वीच दोन चोरट्यांना पकडण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले. चौकशीत त्यांनी १३ लाख ९० हजार रुपयांच्या चोरीच्या १२ दुचाकी पोलिसांना काढून दिल्या.
शिरपूर तालुक्यातील वाघाडी ते वाडी गावांदरम्यान कुवे फाटा येथे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी दोन व्यक्ती येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कार्यवाहीच्या सूचना केल्या. पथकाने वाघाडी रस्त्यावर नाकाबंदी करुन अनिल पावरा (२२, रा.शिंगावे, ता.शिरपूर, हल्ली मुक्काम तेलखेडी,.धडगाव, नंदुरबार) आणि दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा (२०, रा.मोयदा, शिरपूर, हल्ली मुक्काम विखरण ता.शिरपूर) यांना अडविले. त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. चौकशीवेळी त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून १३ लाख ९० हजार रुपयांच्या १२ दुचाकी या वाघाडी, कुवे, शिंगावे, अर्थे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्तगत केल्या. या दोघा चोरांनी या दुचाकी धुळे, नंदुरबार, जळगाव, बडवानी येथून चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या १२ दुचाकींमुळे १० गुन्ह्यांची उकल झाली. शिरपूर शहर पाच, शिरपूर तालुका एक, शहादा दोन, पानसेमल (जि.बडवानी) एक, बाजारपेठ (जि.जळगाव) या पोलीस ठाण्यांचा हद्दीतून या दुचाकी चोरी केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
याप्रकरणी हवालदार रवींद्र आखडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी आणि शोध पथकातील हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, विलास कोळी, जितेंद्र अहिरराव यांनी ही कामगिरी केली.