धुळे : महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान व सेवा हक्क दिनानिमित्ताने सेवा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम महसूलमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांसह काशिराम पावरा, मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल या आमदारांसह माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी, महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी यापुढे प्रत्येक महसूल मंडळात वर्षांत चारवेळा महाराजस्व अभियान राबविण्यात यावे, ॲग्रीस्टॅकची शंभर टक्के नोंदणी पूर्ण करावी, अशा सूचना केल्या. लवकरच राज्यातील प्रत्येक मंजूर घरकुल धारकांना पाच ब्रास रेती घरपोच देणार असून तलाठी ते अपर जिल्हाधिकारी पदाच्या पदोन्नतीचे एकही प्रकरण प्रलंबित ठेवणार नाही. जिल्ह्यात चांगला उपक्रम राबविल्यास तो संपूर्ण राज्यात पथदर्शी म्हणून राबविण्यात येईल. राज्याच्या महसूल विभागात धुळे जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहावा, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री रावल यांनी, महाराजस्व अभियान हा उपक्रम वर्षभर सुरू ठेवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रास्ताविकात, महसूल अधिकारी, कर्मचारी पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ८६ किलोमीटरचे पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले असल्याचे नमूद केले.
यावेळी पोलीस पाटील सेवा अभिलेख प्रणालीचे लोकार्पण, मंडळस्तरावरील ई-ऑफिस प्रणालीचे लोकार्पण, भूमिअभिलेख विभाग ऑनलाईन सेवा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अनुदान वाटप, जिवंत सातबारा वाटप मोहीम, ॲग्रीस्टेक योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी वाटप, प्राधान्य कुटूंबातील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निराधार योजना अनुदान वाटप, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, वनहक्कधारक लाभार्थीना वनहपट्टांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप यावेळी करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शेवटी सर्व उपस्थितांना सेवा हक्क हमी कायद्याची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणे यांनी केले.