जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून, सर्व ७५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. ही निवडणूक स्वबळावर लढायची की महायुतीच्या माध्यमातून याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. मात्र, यंदा महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी पक्ष सज्ज झाल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. भाजपचा हा निर्धार महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासाठी अस्वस्थ करणारा आहे.

जळगाव महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर दीपक सूर्यवंशी यांनी भाजपची संघटनात्मक तयारी तसेच आगामी रणनीतीविषयी माहिती दिली. गेल्या निवडणुकीत भाजपने जळगाव महापालिकेत ५७ जागांवर विजय मिळवून मोठी आघाडी घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागला आहे. शहरात ३६१ बूथ आहेत. महापालिकेच्या निवडणुकीची खिंड लढविण्यासाठी पक्षाने बूथ रचना मजबूत करण्यावर यापूर्वीच भर दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे, असेही दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले.

शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याची सध्या चर्चा आहे. त्याचा महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाव जाणवू शकतो, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमधील युतीचा जळगाव महापालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वास भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. यापूर्वीही मनसे आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. तरीसुद्धा भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढत ५७ जागांवर निर्विवाद विजय मिळविला होता. आजही आमचा कार्यकर्ता तळागाळात प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यामुळे उद्या कोणीही युती केली, तरी भाजपच्या विजयावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे सूर्यवंशी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने गेल्या पंचवार्षिक काळात जळगाव शहरातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. जळगावच्या विकासासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांनी सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जळगाव महापालिकेची कर्जमुक्ती शक्य झाली. प्राप्त निधीमुळे शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, उड्डाणपुलांची कामे तसेच इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची कामे गतिमान झाली आहेत. यापुढील काळातही शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला आहे.