जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वडगाव टेक येथे हिवरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली नीता भालेराव (१४) ही मुलगी पाय घसरून पडल्याने बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. गेल्या दोन दिवसांपासून शोध सुरू असताना रविवारी सकाळी तिचा मृतदेह घटनास्थळापासून चार किलोमीटरवर परधाडे शिवारात आढळून आला.
दरम्यान, आपली नात हिवरा पाण्यात वाहून गेल्याची माहिती समजताच आजोबा श्यामराव विठ्ठल खरे (७२) यांचाही हृदय विकाराचा झटक्याने शुक्रवारी मृत्यू झाला होता. नीता तिच्या मामीबरोबर नेहमीप्रमाणे हिवरा नदीवर शुक्रवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेली होती. त्याच वेळी अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट नदीत जाऊन पडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर आधीच हिवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत नीता वाहून गेली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मामीने सुद्धा नदीच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने त्या देखील बुडू लागल्या. घडलेली घटना लक्षात येताच आजुबाजुच्या नागरिकांनी मामी आणि भाचीला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, त्यांना दोघींपैकी फक्त मामीला वाचविण्यात यश आले होते. तेव्हापासून नीताचा शोध हिवरा नदीत पाचोरा पोलिसांसह नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून सुरू होता.
दुसरीकडे, आपली नात हिवरा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समजताच तिचे आजोबा श्यामराव खरे यांना घरी हृदय विकाराचा झटका आला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खरे परिवारावर एकाच वेळी दुःखाचा दुहेरी आघात झाला. नीता ही पाचोरा शहरात नववीच्या वर्गात शिकत होती. लहानपणीच वडील वारल्याने ती वडगाव टेक येथे आजोळी बहिणीसोबत राहत होती. तिची आई मजुरीसाठी दुसऱ्या शहरात वास्तव्यास आहे. नीताचा शोध घेण्यासाठी पाचोरा नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सगळीकडे शोध घेऊनही नीता शुक्रवारी सायंकाळपर्यंत सापडली नाही. त्यामुळे शनिवारी दिवसभर पुन्हा नीताचा शोध घेण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशीही काहीच उपयोग झाला नाही.
रविवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू झाल्यावर साधारण १०:४५ वाजता नीताचा मृतदेह परधाडे शिवारातील हिवरा नदी पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. उत्तरीय तपासणीनंतर तिच्यावर वडगाव टेक येथेच शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.