जळगाव – एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात शेत कुंपनाच्या तारांमध्ये सोडलेल्या विजेचा धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले होते. या प्रकरणी पाच जणांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून शेतकरी बंडू युवराज पाटील (६४, रा. वरखेडी) यांच्या विरोधात सदोष मणुष्यवधासह इतर एक, असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा अटक देखील केली.
वरखेडी शिवारातील मुख्य रस्त्यालगतच्या मक्याच्या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बंडू पाटील या शेतकऱ्याने बांधावर वीज तारांचे कुंपन करून त्यात वीज प्रवाह सोडलेला होता. दरम्यान, त्या शेतात मंगळवारी रात्री उशिरा प्रवास करून झोपलेल्या आदिवासी पावरा कुटुंबावर काळाने घाला घातला. विजेचा जोरदार धक्का लागून एकाच कुटुंबातील त्या पाच जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. मृतांमध्ये विकास पावरा-सोळंकी (३०), त्याची पत्नी सुमन पावरा-सोळंकी (२५), मुलगा पवन (४), मुलगी कवल (३) आणि सासू लीलाबाई पावरा (६०) या पाच जणांचा समावेश होता.
या घटनेला जबाबदार धरून शेतकरी बंडू पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि विद्युत कायदा १३५ व १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुरूवारी रात्री उशिरा एरंडोल पोलिसांनी त्यांना अटक देखील केली. शेतकरी पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पाच जणांचा जीव घेणाऱ्या वीज तारेचे कुंपन करण्यासह त्यास जोडलेली तार काढून घेत ती शेतातील पत्री शेडमध्ये लपवून ठेवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यामुळे दोन रान डुकरे दगावली आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी पंचनामा करत वन्य जीव अधिनियम अंतर्गत शेतकरी पाटील यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड पुढील तपास करत आहेत.
मृतांवर मध्य प्रदेशात अंत्यसंस्कार
दरम्यान, एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पाच जणांच्या मृतदेहाची गुरूवारी उत्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळगावी निरसर तांड्याकडे रवाना झाले. मात्र, शववाहिका फक्त बऱ्हाणपुरपर्यंतच गेली. त्यापुढे कच्चा रस्ता असल्याने शववाहिकेतून मृतदेह उतरवून ते ट्रॅक्टरमध्ये टाकून पुढे दुर्गम भागातील निमसर तांड्यापर्यंत पोहोचवण्यात आले. तिथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. विजेच्या धक्क्याने संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पावल्यानंतर दीड वर्षाची बालिका दुर्गा तेवढी वाचली होती. प्राथमिक उपचार करून दुर्गाला आजोबा रामलाल पावरा यांच्याकडे सोपवण्यात आले.