जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर धुळे-जळगावदरम्यान पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील टोल नाक्याची बुऱखाधारी तरुणांनी तोडफोड करुन कक्ष पेटवून दिल्याची घटना मध्यरात्रीनंतर घडली. संबंधित टोल नाका सोमवारपासून सुरू होणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्याची तोडफोड झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर पारोळा शहरापासून काही अंतरावरील सबगव्हाण खुर्द येथील टोल नाक्याचे काम अपूर्ण होते. काम पूर्ण झालेले नसतानाही तो ११ मार्चपासून सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते.
रविवारी मध्यरात्री विनाक्रमांकाच्या मोटारीतून काही बुरखाधारी आले. त्यांनी टोल नाक्याचे कक्ष पेट्रोल टाकून पेटवून देत तोडफोड केली. तेथील आणखी एका कक्षाचीही तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी पलायन केले. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात १३ गावठी बंदुकांसह सहा जण जाळ्यात
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे पाळधी ते तरसोद वळणरस्तादरम्यान, तसेच अनेक भागांचे काम अपूर्ण असताना टोल नाका सुरू करणे कितपत उचित आहे, असा प्रश्न वाहनधारकांतून उपस्थित केला जात आहे. सबगव्हाण गावानजीकचा टोल नाका सुरू करण्यास पारोळा तालुक्यातील नागरिकांनीही विरोध केला आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना टोलनाक्यास विरोधासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.