नाशिक : महायुतीत कुठेही रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप होऊनही सांगलीत बंडखोरी झाली. त्यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात महायुतीत मात्र तसे होणार नाही, असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. नाशिकच्या जागेबाबत त्यांनी, जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रत्येक पक्ष आपला उमेदवारीसाठी आग्रही असणे स्वाभाविक आहे. एकदा निर्णय झाल्यावर तीनही पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, असे नमूद केले.
उपाध्ये यांनी येथे पत्रकार परिषदेत भाजपच्या संकल्प पत्राची माहिती दिली. महायुतीत जागा वाटपावरून संघर्ष सुरू असल्याच्या प्रश्नावर त्यांनी महाविकास आघाडीकडे बोट दाखवले. पाच टप्प्यात निवडणूक होत आहे. निवडणूक जशी पुढे जाईल, तसे महायुतीचे उमेदवार दिले जातील. निर्णय होईपर्यंत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मतदारसंघ आपला असला पाहिजे असे वाटते. नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्याला तसे वाटते. यात गैर काहीही नसल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार
काँग्रेसच्या काळात ठराविक लोक वगळता सामान्य नागरिकांची गरिबी दूर झाली नाही. भाजपने देशभरातील सूचना घेऊन हे संकल्पपत्र तयार केले. १४ वर्षांपूर्वी आणि आजच्या कृषिमालाच्या हमीभावाची पडताळणी करा. आम्ही मोदी यांच्या हमीवर बोलायला तयार आहोत. पण काँग्रेसने आधी २००४ ते २०१४ या कालावधीतील भ्रष्टाचाराबाबत उत्तरे द्यायला हवीत, असे आव्हान त्यांनी दिले.
हेही वाचा…जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. राऊत यांची बडबड भाषा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्या पाठिशी राम उभा राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची न्याययात्रा ज्या ठिकाणी गेली, तेथील लोक पक्ष सोडून गेले. इंडिया आघाडीत कम्युनिस्ट व काँग्रेस आहेत. त्याच कम्युनिस्ट पक्षाने वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. ही इंडिया आघाडीची स्थिती असून महाविकास आघाडीची वेगळीच स्थिती असल्याचा टोला त्यांनी हाणला. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्यावर उपाध्ये यांनी टिकास्त्र सोडले. देशमुख यांनी काँग्रेस का संपली, याचे चिंतन करावे. महाराष्ट्रात गेल्यावेळी एक खासदार निवडून आला होता. यावेळी तो तरी येईल की नाही, अशी परिस्थिती असल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले.