नंदुरबार – नंदुरबारमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध घरकुल योजनांमध्ये पैस घेतल्याखेरीज कुठलेही काम शासकीय यंत्रणांकडून केले जात नसल्याचा पाढा तक्रारदारांनी आमदारांनी बोलवलेल्या घरकुल आढावा बैठकीत वाचला. आमदार आमश्या पाडवी यांनी व्यासपीठावरून अधिकाऱ्यांना पैसे घेण्याबाबत अनेक पुरावे आपण देतो, असे जाहीर केले. यापुढे पैशांची मागणी झाल्यास संबंधीताला कामावरुन काढण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

जिल्ह्यात घरकुल योजनांमधील विविध समस्यांबाबत लाभार्थ्यांच्या समस्या पाहता जिल्ह्यातील आमदार डॉ. विजयकुमार गावित वगळता सर्वच आमदारांनी घरकुल आढावा बैठक बोलावली होती. बैठकीला समस्याग्रस्त लाभार्थ्यांना देखील बोलविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला राजेश पाडवी, आमश्या पाडवी, चंद्रकात रघुवंशी हे आमदार उपस्थित होते. बैठकीत प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल, मोदी आवास तसेच शबरी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी समस्यांचा पाढा उपस्थित आमदारांपुढे वाचला.

घरकुलांसाठी निवड होवून ड यादीत नाव आल्यानंतरही घरकुलाचा पहिला हप्ता देखील मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. काहींनी पहिल्या ड यादीतील २०१७ च्या लाभार्थ्यांना देखील घरकुल पूर्ण करुन पैसे मिळाले नसल्याबाबत तक्रारी केल्या. घरकुलाच्या प्रत्येक टप्प्यावर फोटो काढून अपलोड करण्यासाठी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला. याबाबत तक्रार केल्यास अशा संबंधीतांवर तातडीने कारवाईचे आदेश आमदार राजेश पाडवी यांनी यंत्रणेला दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धडगावसारख्या आदिवासीबहुल नगरपंचायतीलाच शबरी घरकुल योजनेच्या शहरी योजनेतून घरांचे तीन- चार वर्षांपासून उद्दिष्टच दिले नसल्याबाबत आमश्या पाडवींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सात दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना आमदार रघुवशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांना दिल्या. बैठकीला प्रकल्प संचालक राहुल गावडे, नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुसूरकर आदी उपस्थित होते.