नाशिक : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळासाठी राज्य शासनाने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सहा लाख रुपये उपलब्ध करुन जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळास ११ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले. गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या भिंतींना परवानगी देण्याची मागणी अनेक मंडळांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आवाजाची जी मर्यादा घालून दिली आहे, त्या मर्यादेत परंपरागत जे काही वाद्य आहे, त्यांना परवानगी दिली जाईल, असे भुसे यांनी म्हटले आहे. आवाजाच्या भिंती परंपरागत वाद्यांच्या गटात बसत नसल्याने त्या बाबतचा संभ्रम कायम राहिला आहे.
गणेशोत्सव पूर्वतयारीची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंडळांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनपा, पोलीस, महावितरण आणि मंडळांचे पदाधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी मंडळांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळांना कुठलीही अडचण येऊ नये तसेच त्यांच्या अडचणींचे तातडीने निवारण होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात पोलीस, महापालिका आणि वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांचे एक पथक नेमण्याची सूचना त्यांनी प्रशासनास केली.
हेही वाचा : हतनूर धरणाचे १८ दरवाजे दीड मीटरने उघडले; तापीच्या पातळीत वाढ
गणेशोत्सव काळात शहरात स्वच्छता राखली जाईल, वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करावी. विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, अतिक्रमण काढणे, मिरवणुकीस अडथळा येणाऱ्या विद्युत तारा हटवून रस्ता भाविकांसाठी मोकळे राहतील याची दक्षता घ्यावी, असे भुसे यांनी सूचित केले. गणेशोत्सवामुळे मुस्लिम बांधव ईद ए मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढणार आहेत. या निर्णयाचे कौतुक करुन भुसे यांनी आभारही मानले. बैठकीत प्रारंभी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवानगी तातडीने देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गणेश मंडळांनीही नियमांचे पालन करावे आणि शासनाने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
हेही वाचा : मालमोटारीखाली दबून सोनगीर रुग्णालयातील महिला डॉक्टरचा मृत्यू
शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत आरास खुली
गणेशोत्सवात शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत आरास खुली ठेवण्यास मंडळांना परवानगी देण्यात येणार आहे. या काळात देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. कालावधी वाढविल्याने भाविक आपल्या वेळेनुसार देखावे पाहू शकतील. गणेश मंडळांना जाहिरात शुल्कात सवलत मिळणार आहे. मंडळांकडून जाहिरात कर आकारू नये, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.