नाशिक : खानपान सेवा (केटरिंग) पुरविण्याच्या व्यवसायात जे पाणी वापरले जाते, त्याचे नमुने तपासून अनुकूल अहवाल देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणूजीव सहायक वैभव सादिगले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली आणि अन्य तीन अशा चार संस्थांचा खानपान सेवा पुरविण्याचा व्यवसाय आहे. या चार संस्था खानपान सेवेत जे पाणी वापरतात, त्याचे चार नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत आणले गेले होते.

यावेळी वरिष्ठ अणूजीव सहायक सादिगले याने नमुन्यांचे अनुकूल अहवाल देण्याची तयारी दर्शविली, त्यासाठी शासकीय शुल्का व्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे ५०० रुपये यानुसार चार नमुन्यांचे एकूण दोन हजार रुपये लाच मागितली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारत असताना सादिगले यास पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिरा आदामाने करीत आहेत.

हेही वाचा : नरडाणा वसाहतीत रासायनिक उद्योगास भाजपचा विरोध, उद्योग मंत्र्यांविरोधात आंदोलनाचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रयोगशाळेतील अहवालांवर प्रश्नचिन्ह

या कारवाईतून खाद्यपदार्थ निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीअंती अनुकूल देण्यातही आरोग्य प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याकडून लाचखोरी होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. अनेकदा पाण्याच्या नमुन्यांबाबत शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल क्रमप्राप्त ठरतो. या ठिकाणी लाचखोरीतून प्रतिकूल नमुने अनुकूल म्हणून दर्शविले गेल्यास सामान्यांना त्याची झळ बसू शकते. त्यामुळे संशयिताकडून आजवर दिल्या गेलेल्या पाणी नमुने अहवालाची पडताळणीची गरज व्यक्त होत आहे.