जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोदसह परिसरात सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच आता शेतकर्‍यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांना अधिक मजुरी देणेही परवडत नसल्याने शेतात कापूस झाडांना लटकलेल्या अवस्थेत आहे. कापसाला प्रतिक्विंटल सात हजारांचा भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जामनेर तालुक्यातील वाकोदसह परिसरात सुरुवातीला कमी पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नदी, नाले कोरडेठाक होते. कापूस, मका, तुरीच्या पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. काही शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च झाला.

हेही वाचा : नाशिक : नायलाॅन मांजा विक्रेत्यास अटक

अनेक शेतकर्‍यांनी उसनवारी, उधारीवर, तर काहींनी सावकाराचे कर्ज घेऊन खर्च केला. कमी पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादन खूपच कमी झाले. कापसाला एकरी दोन क्विंटलचा उतारा येणे मुश्किल झाले आहे. अवकाळी पावसामुळे कापूस वेचणीला विलंब झाला आणि भिजला. ऐन बहारात असताना तुरीच्या पिकाचेही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. तुरीच्या उत्पादनात कसर भरून निघेल, अशी अपेक्षा होती; परंतु सततचे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे तुरीचे नुकसान झाले आहे, असे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले. एकाच वेळी अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडल्याने मेटाकुटीला आले आहेत.

हेही वाचा : धुळ्यात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी सात हजार रुपये भावही मिळणे कठीण झाले आहे. आता वेचणीसाठी किलोमागे दहा रुपये द्यावे लागत आहेत. भाव कमी असल्याने खत आणि फवारणीसाठी झालेला खर्च निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने कापसाची खरेदी करून भाव वाढवून द्यावा. शिवाय, एकरी अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.