नाशिक – प्रशासनाने मागण्या मान्य कराव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन, वर्ग चार कर्मचारी संघटनेने आदिवासी विकास भवनासमोर दिलेला ठिय्या आठव्या दिवशीही कायम असला तरी आंदोलकांची गर्दी काहीअंशी कमी झाली. त्यामुळे आंदोलक कमी आणि पोलीस अधिक असे चित्र निर्माण झाले आहे.
आंदोलकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आदिवासी विकास भवनाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बुधवारी सकाळी माकपचे नेते जे. पी. गावीत यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या अडचणींविषयी चर्चा केली. आदिवासी विकास मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी त्यांसदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलकांनी आता मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग करण्याचा इशारा दिला आहे. पाऊस आणि उघड्यावरील मुक्कामामुळे आतापर्यंत आंदोलकांना रक्तदाब कमी-जास्त होण्यासह अन्य काही तक्रारींना तोंड द्यावे लागत आहे.
सात दिवसांहून अधिक कालावधी लोटला तरी प्रशासन ढिम्म असल्याने आंदोलकांमध्ये काही अंशी नैराश्य आले आहे. परंतु, मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनास अधिक दिवस झाल्याने काहींनी घरचा रस्ता धरला. आंदोलन काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साधारणत: हजार पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या सत्रात कार्यरत आहेत.