लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातील काठे गल्ली येथील मोकळ्या जागेत असलेल्या धार्मिक स्थळासभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर शनिवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. धार्मिक स्थळाला धक्का न लावता ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. दुसरीकडे, संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले नसल्याचा आरोप करत उर्वरित अतिक्रमणही हटविण्याचा आग्रह भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी धरला.

काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्त्यावरील धार्मिक स्थळाभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मोहीम शनिवारी सकाळी महापालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरू केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरातील आठ मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. काठेगल्ली सिग्नल आणि परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्रित जमण्यास प्रतिबंध केला. द्वारका, काठे गल्ली, भाभा नगरकडून जाणारे मार्ग आणि सभोवतालच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केल्यामुळे या भागास पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे धार्मिक स्थळ आहे. त्याच्या सभोवतालचे अतिक्रमण हटविल्यानंतर मोहीम थांबविण्यात आली. मागील दोन-तीन दिवसात महापालिकेच्या विरोधात आंदोलनासाठी काठे गल्ली चौकात एकत्रित जमण्याचे संदेश समाजमाध्यमात फिरत होते. या दिवशी परिसरात कोणत्याही मोर्चास आणि आंदोलनास परवानगी दिली गेली नाही. कारवाई सुरू असताना या भागात आलेले महंत सुधीरदास पुजारी आणि आठ ते १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या भागात ही कारवाई झाली, तिकडे जाणारे सर्व रस्ते लोखंडी जाळ्या लावून बंद करण्यात आले. कोणालाही या भागात प्रवेश देण्यात आला नाही, त्यामुळे सभोवतालच्या नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या भागास भेट दिली. वक्फ बोर्डाचा बडगा दाखवून अतिक्रमणे केली जातात, असा आरोप त्यांनी केला. स्थानिक नागरिकांच्या अतिक्रमणाविषयी तीव्र भावना असून प्रशासनाने संपूर्ण अतिक्रमण काढावे, अशी मागणी त्यांनी केली.

दोन्ही समुदायांना समजावून शांततेत ही मोहीम पार पडली. काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलगिली व्यक्त केली. महापालिका सर्व कागदपत्रे पडताळून, कायदेशीर मत घेऊन पुढील कारवाई करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धार्मिक स्थळाला धक्का न लावता कारवाई

मोकळ्या जागेत अनेक वर्षांपासून अस्तित्वात असणाऱ्या धार्मिक स्थळाला धक्का न लावता, त्याचा आदर राखून या स्थळाच्या सभोवतालचे अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईनंतर शहर ए खतीब आणि माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी धार्मिक स्थळास भेट दिली. धार्मिक स्थळास कुठलाही धक्का लागला नसल्याने उभयतांनी समाधान व्यक्त केल्याचे महापालिकेने म्हटले आहे.