नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलापूर येथे कार्यान्वित झालेल्या केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या (सीपीआरआय) प्रादेशिक इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेवरून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
या प्रयोगशाळेच्या उद्घाटन सोहळ्यास माजी खासदार गोडसे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. या प्रयोगशाळेसाठी आपण पाठपुरावा केला. मात्र, त्याचे श्रेय मंत्री भुजबळ हे लाटत असून स्थानिक पातळीवर काहीही कामे झाली तरी ती केवळ आपणच केल्याचे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, अशी आगपाखड गोडसे यांनी केली. जाहिरातीत भुजबळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे वगळली.
या प्रयोगशाळेला फेब्रुवारी २०१३ मध्ये तत्वत: मान्यता मिळाली होती. तेव्हा काही काळ समीर भुजबळ हे खासदार तर, छगन भुजबळ हे मंत्री होते. परंतु, दीड वर्षात त्यांना प्रयोगशाळेसाठी जागा ताब्यात घेता आली नाही. कारण, शिलापूर येथील गायरानची १०० एकर जागा प्रयोगशाळेसाठी घेऊन उर्वरित ५० एकर जागा आपल्या शिक्षण संस्थेला कशी मिळेल, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे ग्रामस्थांनी जागा देण्यास विरोध केला होता, याकडे गोडसे यांनी लक्ष वेधले. भुजबळ परिवाराकडून लोकांना फसविण्याचे काम केले जाते, महायुतीचा धर्म ते पाळत नाही. असे आरोप गोडसे यांनी केले होते.
गोडसे यांच्या आरोपांना मंत्री भुजबळ यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. प्रयोगशाळेचे श्रेय केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर घेतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील की छगन भुजबळ घेतात, याचा अभ्यास जनता करेल, असा टोला त्यांनी गोडसे यांना हाणला. आम्ही जमीन दिली. दिल्लीतील कंपनीशी करारनामा झाला. तुम्ही मग काम सुरू करायचे होते ना, असे नमूद करीत किती वर्ष लागतात काम करायला, असे त्यांनी गोडसे यांना सुनावले.
१२ ते १३ वर्ष झाली. आम्ही मागे लागलो. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रयोगशाळेचे काम पूर्णत्वास गेल्याचा दावा मंत्री भुजबळ यांनी केला. स्थानिक उद्योगांना प्रयोगशाळेकडून लागणारे प्रमाणपत्र बाहेरून मिळवावे लागत होते. त्यास बराच कालापव्यय होत असे. उद्योजकांच्या मागणीनुसार आम्ही १०० एकर जागा मिळवून दिली. तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी दिल्लीत पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले.