नाशिक : लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री मुख्य बाजारपेठेत लागलेल्या भीषण आगीत वर्धमान हे कपड्याचे दालन भस्मसात झाले. फटाक्यांची ठिणगी पडल्याने ही आग लागल्याचा अग्निशमन दलाचा अंदाज आहे. या दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. तब्बल १८ बंबांनी सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवत बाजारपेठेत आग पसरणार नाही, याची दक्षता घेतल्यामुळे मोठे नुकसान टळले.

रेडक्रॉस सिग्नलजवळील मुंदडा मार्केट येथे वर्धमान हे चादर, बेडशीटचे दुकान आहे. एका वाड्यातील तीन मजली दुकानाचा वरील भाग पत्र्याचा असून त्यावर गवत उगवलेले होते. लक्ष्मी पूजनच्या दिवशी फटाक्याची ठिणगी, त्यावर पडली आणि ही आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाचे अधिकारी संजय व प्रदीप परदेशी यांनी व्यक्त केला. उषा वर्धमान दुगड यांच्या मालकीचे हे दुकान आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुगड कुटुंबिय सायंकाळी पूजा करून घरी निघून गेले होते. रात्री सव्वा अकराच्या सुमारास दुकानाच्या वरील भागास आग लागल्याचे आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आले.

हेही वाचा : जळगावात गुटख्यासह १९ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चादर, बेडशीटसारख्या कपड्यांमुळे काही वेळात आगीने रौद्र रुप धारण केले. हा संपूर्ण बाजारपेठेचा परिसर आहे. आग इतरत्र पसरू नये म्हणून अग्निशमन दलाने मुख्य केंद्रासह सातपूर, सिडको व पंचवटी केंद्रातील एकूण १८ पाण्याचे बंब घटनास्थळी बोलावले. महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार, उपायुक्त प्रशांत पाटील व नितीन नेर यांनी घटनास्थळी धाव घेत मार्गदर्शन केले. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु, दुकानातील बहुतांश माल भस्मसात झाला. सकाळी आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.