नाशिक : शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित्त संपूर्ण सप्ताह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देहदान आणि अवयवदान सप्ताह म्हणून राबवला जात आहे. यानिमित्ताने देहदान आणि अवयवदानचा प्रचार आणि प्रसार केला जात असून यासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमजही दूर करण्यात येत आहेत. देहदान, अवयवदानाला सध्याच्या धावपळीच्या जगात अनन्यसाधारण महत्व आहे. भारतात याबाबत जनजागृती, प्रचार आणि प्रसार कमी असल्याने वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ५० विद्यार्थ्यांमागे केवळ एक मृतदेह मिळतो. साधारणपणे १० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह मिळाला तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास व संशोधन करू शकतात. युरोपमध्ये हेच प्रमाण पाच विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह असे आहे. देशात शहरी भागासह ग्रामीण भागातही देहदान आणि अवयवदान याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे सहसा कोणी त्यासाठी तयार होत नाहीत. गैहसमज हा देहदान, अवयवदान चळवळीतील एक मोठा अडथळा आहे. गैरसमज दूर करण्यासाठी विविध संस्थांकडून प्रबोधन करण्यात येत आहेत. देहदान किंवा अवयवदान करण्याची इच्छा असलेल्या अनेकांना या प्रक्रियेसंदर्भात माहिती नसल्याचेही दिसून येते. त्याविषयीही अंनिसकडून प्रबोधन केले जात आहे. मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपला अर्ज जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरणे आवश्यक असते.

हेही वाचा : नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरीचे संकेत, उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर संतप्त

अवयवांचे प्रत्यारोपण ही आधुनिक विज्ञानाची मोठी देणगी आहे. शासनातर्फे यासाठी पुढाकार घेतला जात आहे. साधारणपणे भारतात दरवर्षी पाच लाख मृत्यू हे केवळ अवयव उपलब्ध न झाल्यामुळे होतात. निकामी झालेले अवयव दुरुस्त करणे किंवा नवीन प्रत्यारोपण हे तंत्र आता विकसित झाले आहे. श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते. तिथे व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचे शरीर सरकारजमा होते. श्रीलंका हा देश स्वतःच्या रुग्णांची गरज भागवून डोळ्यांची निर्यात करतो. जगात स्पेन हा देश अवयवदानात एक नंबरवर आहे. भारतात अवयवदानाचा संकल्प करून प्रतिज्ञापत्रक भरण्याचे प्रमाण लोकसंख्येच्या फक्त ०.०१ टक्के इतके आहे. प्रत्यक्ष अवयवदानाचे प्रमाण त्यापेक्षाही कमी आहे. आपल्या देशात याबाबत मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धांना दूर करण्यासाठी अंनिसकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. कुणाला अवयवदान व देहदानाचा संकल्प करायचा असेल तर त्यांनी मदतीसाठी कृष्णा चांदगुडे ९८२२६३०३७८ या नंबरवर संपर्क साधावा., असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ टी.आर. गोराणे यांनी केले आहे. शहीद दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहभर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देहदान आणि अवयवदानाविषयी प्रचार आणि प्रसार केला जात आहे.

हेही वाचा : घरबसल्या मतदानाचे अर्ज भरताना यादीतील दोष कसे उघड झाले ?

प्रबोधनाची गरज का ?

देहदान आणि अवयवदान मोहिमेत देशात अनेक गैरसमज, अंधश्रध्दा आहेत. त्यामुळे देहदान, अवयवदान करण्यास सहसासहजी कोणी तयार होत नाही. या चळवळीतील हे अडथळे दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंनिससह विविध संस्थांकडूनही प्रबोधन करण्यात येत आहे. देहदान किंवा अवयवदान करण्याची इच्छा काही जणांना असली तरी, त्यासंदर्भातील प्रक्रियेसंदर्भात माहिती नसल्याने त्यांना काही करता येत नाही. त्याविषयीही अंनिसकडून प्रबोधन केले जात आहे.