नाशिक : शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभेच्या नाशिक मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघात आधीपासून तयारीला लागलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी संताप व्यक्त करुन निवडणूक लढणार असल्याचे सुतोवाच केले. तत्पुर्वी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाईल आणि दोन दिवसांत भूमिका जाहीर केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाने उमेदवाराची घोषणा केल्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. करंजकर समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. खुद्द करंजकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आततायीपणे कुठलीही कृती न करता आपण निवडणूक ’लढणार आणि पाडणार‘ असल्याचे नमूद केले. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत आपण इच्छुक होतो. दोन्ही वेळा पक्षप्रमुखांनी थांबायला सांगितले. यावेळी मात्र वर्षभरापूर्वी तयारीला लागण्यास सांगितले होते. तेव्हापासून आपण पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मतदारसंघ पिंजून काढला. सर्व सर्वेक्षणात आपल्या नावास पसंती होती. निवडणूक जिंकण्याचे सर्व तंत्र-मंत्र आपणास ज्ञात असल्याचे वरिष्ठांसमोर मांडले होते. आपल्या निष्ठेचे काय फलित मिळाले, असा प्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा : घरबसल्या मतदानाचे अर्ज भरताना यादीतील दोष कसे उघड झाले ?

जी व्यक्ती इच्छुक नव्हती, पक्षाने त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. एक-दोन दिवसांत हे बदल झाले. अखेरच्या क्षणी आपले तिकीट कापले गेल्याने आपली ताकद दाखविण्याचा इशाराही करंजकर यांनी दिला. जिल्हाप्रमुख म्हणून १३ वर्षे आपण काम केले. या काळात निष्ठा कधीही विकली नाही. अनेकांना तिकीटे दिली. प्रामाणिकपणे सर्वांचे काम केले. आपण गद्दार नाही तर, खुद्दार आहोत. कुणाच्या राजकीय भविष्याशी खेळणे चुकीचे आहे. काही निर्णय उलटपालट होतात. वाट बघावी लागते. पक्षप्रमुखांची भेट घेऊन काही गोष्टी पटवून देईल. दरवेळी आपण थांबणार नाही, असे त्यांनी सूचित केले. आततायीपणा करण्यापेक्षा पुढील निर्णय शांतपणे जिंकण्यासाठी घेतला जाईल, असे करंजकर यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत माजी आमदार योगेश घोलप उपस्थित होते. इतर स्थानिक पदाधिकारी अनुपस्थित होते.