नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारी वाहतूक ही नाशिक प्राधिकरण क्षेत्रातून होणार असल्याने आणि या क्षेत्रातील वाढत्या औद्योगिकरणामुळे भविष्यात वाहतुकीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होण्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए) हद्दीत मोठ्या रुंदीच्या रस्तांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. प्राधिकरण क्षेत्रात विकास परवानग्या देताना पोहोच रस्त्याची रुंदी किमान १५ मीटर बंधनकारक करण्यात आली आहे.

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात एकूण २७५ गावांचा समावेश आहे. या निर्णयाद्वारे एनएमआरडीए क्षेत्रात मोठ्या रस्त्यांचे जाळे विकसित होईल. या संदर्भातील आदेश एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास आराखड्यानुसार अस्तित्वातील व प्रस्तावित वर्गीकृत रस्त्यांचा विचार करून या गावंमध्ये प्राप्त होणाऱ्या विकास परवानगीच्या प्रस्तावांना प्राधिकरण मान्यता देते. एनएमआरडीए क्षेत्रातील विकास लक्षात घेता नाशिक महानगरपालिका हद्दीतून येणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यांचे समन्वय साधून नियोजन होणे आवश्यक आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारी वाहतूक नाशिक प्राधिकरण क्षेत्रातून होईल. शिर्डी, ओझर विमानतळावरून होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन आणि नाशिक प्राधिकरण क्षेत्रात वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतुकीचे व्यवस्थापन होण्यासाठी आताच मोठ्या रस्त्यांचे जाळे प्राधिकरण क्षेत्रात विकसित होणे आवश्यक आहे.

प्राधिकरणाकडे विकास परवानगी मिळवण्यासाठी प्राप्त होणाऱ्या बहुतांश प्रस्तावातील जागा जवळच्या सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या जागांतून संबंधित जागा मालकाच्या संमतीने पोहोच रस्ता उपलब्ध करून घेतला जातो. प्रचलित एकिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार आवश्यक उपलब्ध पोहोच रस्त्याच्या रुंदीनुसार प्रस्तावित जागेत विकास परवानगी दिली जाते. त्या अनुषंगाने भविष्यात मोठ्या रुंदीच्या आवश्यकता विचारात घेऊन या पोहोच रस्त्यांची किमान रुंदी १५ मीटर इतकी असणे अनिवार्य असेल. काही अपरिहार्य नदी, धरणे, डोंगर असे भौतिक, भौगोलिक अडथळ्यांबाबत महानगर आयुक्त यांच्या पूर्व मान्यतेने किमान १२ मीटर इतक्या रुंदीचा पोहोच रस्ता संमतीने घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ यांनी आदेशात म्हटले आहे.

सहा तालुक्यात अमलबजावणी

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएच्या अखत्यारीत २६४९.१४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये नाशिक, निफाड, सिन्नर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांमधील २७५ गावे समाविष्ट आहेत. उपरोक्त क्षेत्रात मोठ्या रस्तांचे जाळे विकसित करण्यास या निर्णयाचा लाभ होणार आहे.