नाशिक – मुंबईसह नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा अनेक महापालिकांची निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र लढणार आहेत. या संदर्भात चर्चा सुरू असून मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद, वज्रमूठ आता कोणतीही अघोरी शक्ती तोडू शकत नाही, असे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. राज ठाकरे यांनी मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक मनसे-शिवसेना ठाकरे गट एकत्रित लढण्याबाबत केलेल्या विधानांवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात दिलेला स्वदेशीचा नारा म्हणजे ते आज गांधीवादी झाल्याचे द्योतक आहे. मोदींनी स्वदेशीची सुरुवात स्वतापासून करावी, असे राऊत यांनी नमूद केले.
मोदी व भाजपकडून काँग्रेसने काय केले, असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. स्वदेशीची घोषणा ही काँग्रेसची देणगी आहे. पंतप्रधान मोदी यांच्यात नाव घेऊन इशारा देण्याची हिंमत नसल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे नाव घ्यायलाही ते घाबरतात. पाकिस्तानला इशारा देणे सोपे आहे. परंतु, त्यांना पाठबळ देणाऱ्या अमेरिका आणि चीनलाही आव्हान दिले पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले. दुर्बल घटकापर्यंत स्वातंत्र्य पोहोचले नाही. ८० कोटी जनतेला फुकट धान्य देऊन मतं विकत घेतली जात आहे. ही देशाच्या स्वातंत्र्याची शोकांतिका असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
हरियाणातील एका निवडणुकीत न्यायालयाने इव्हीएमच्या केलेल्या फेरमतमोजणीत पराभूत उमेदवार विजयी झाला. याचा अर्थ इव्हीएम घोटाळे करून निवडणूक जिंकल्या जातात. पंतप्रधान मोदी व फडणवीस यांचे सरकार हे अशाच घोटाळ्यातून आलेले सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपने देशाला धर्मांध केले
देशाचे स्वातंत्र ७९ वर्षांचे आहे. या काळात देश प्रगतीपथावर गेला. आज अनेक बाबतीत देश प्रगतीपथावर आहे. त्याचे श्रेय आजवर देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जाते. काहींना २०१४ नंतर देश स्वतंत्र झाल्याचे वाटते. परंतु, तेव्हापासून देश खड्ड्यात गेल्याची टीका खा. राऊत यांनी केली. आजवरच्या प्रत्येक पंतप्रधानाने देशाला प्रगतीपथावर नेण्यात योगदान दिले. भाजपने मात्र २०१४ नंतर श्रद्धाळू, धार्मिक देशाला आपल्या राजकीय स्वार्थासाठी टोकाचे धर्मांध केले. ही धर्मांधता जातीय व धार्मिक फूट पाडत असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते अत्यंत धोकादायक असल्याकडे खा. राऊत यांनी लक्ष वेधले.