नाशिक : मंगळवारी सकाळी नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी अशोक नजन (४०) यांनी स्वत:च्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

नजन हे वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी दिवसपाळीसाठी ते नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता पोलीस ठाण्यात आले. हजेरी लावल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले. त्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. स्वत:च्या पिस्तुलातून त्यांनी डोक्यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली.

हेही वाचा…धुळे : झोपडीत भाऊ-बहीण खेळत असताना लागली आग, अन्…

कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नजन यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याची स्पष्टता झालेली नाही. अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. याआधी त्यांनी जळगाव जिल्ह्यासह नाशिकमधील कळवण तालुक्यात काम केले होते.